Bollywood singer love story : ९० च्या काळात आपल्या सुमधुर आवाजानं अनेकांची मनं जिंकणाऱ्या गायिकेला त्यांच्या गायणातील कारकिर्दीमुळे लग्नानंतर पतीपासून दूर रााहवं लागलं होतं. त्याबद्दल त्यांनी स्वत: सांगितलं होतं.
अनेक चित्रपटांतील गाण्यांतून घराघरात लोकप्रिय झालेल्या बॉलीवूडमधील लोकप्रिय गायिका म्हणजे अलका याग्निक. अलका यांनी आजवर अनेक गाणी गायली आहेत. ९० च्या काळात तर त्या यशाच्या शिखरावर होत्या. परंतु, या क्षेत्रातील कारकिर्दीमुळेच त्यांना त्यांच्या पतीपासून वेगळं राहावं लागलं होतं. त्याबाबत त्यांनी ‘दुर्दर्शन’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.
अलका याग्निक यांनी १९८९ मध्ये उद्योजक नीरज कपुर यांच्याबरोबर लग्न केलं होतं. अलका व नीरज यांचे कौटुंबिक संबंध होते. मुलाखतीत अलका याग्निक म्हणालेल्या, “माझे पती नीरज कपुर उद्योजक आहेत. त्यांचं शिलाँग मेघालय येथे घर आहे. आमचे पूर्वीपासून कौटुंबिक संबंध होते. नीरजच्या मावशी माझ्या आईच्या वर्गमैत्रीण होत्या. मी त्यांना मावशी म्हणायचे.”
अलका याग्निक व नीरज कपूर यांच्या लग्नाला कुटुंबियांचा होता विरोध
अलका याग्निक पुढे त्यांच्या पहिल्या भेटीबद्दल म्हणाल्या, “आम्ही पहिल्यांदा त्याच्या घरी भेटलो होतो आणि आम्ही दोघे प्रेमात पडलो होतो.” महत्त्वाची गोष्ट म्हणजे अलका मुंबईत त्यांचं करिअर करत असताना त्या त्यांच्या पतीपासून दूर राहणार होत्या. त्यामुळे सुरुवातीला अलका यांच्या आई-वडिलांनी त्यांच्या लग्नाला एकमेकांपासून लांब राहून लग्न टिकवता येणार नाही म्हणून विरोध केला होता.
अलका त्यांच्या लग्नाबद्दल सांगताना म्हणाल्या, “आम्ही दोघांनीही आमच्या लग्नासाठी आग्रह धरला होता म्हणून शेवटी ते आमच्या लग्नासाठी तयार झाले होते.” आधी त्यांनी मुंबई आणि शिलाँग दोन्ही ठिकाणी राहण्याचं नियोजन केलं होतं. परंतु, नंतर अलका यांच्या कामाचा व्याप वाढत गेला. त्याबद्दल त्या म्हणाल्या, “या क्षेत्रात मला कामं मिळत गेली आणि खूप वेगानं गोष्टी घडत होत्या. त्यामुळे माझ्यासाठी मुंबई सोडून दुसरीकडे राहणं अशक्य होतं.”
पतीबद्दल अभिनेत्री पुढे म्हणाल्या, “नीरज मला म्हणायचे की, मी तुझ्या करिअरसाठी लकी ठरलो; पण माझ्यासाठी नाही. त्यामुळे ही माझी चूक आहे. कारण- मी त्यांना वचन दिलं होतं.” अलका यांनी पुढे सांगितलं की, लग्नापूर्वी ते दोघे रात्री फोनवर एकमेकांसह बोलत असायचे. परंतु, जेव्हा खूप बिल आलं तेव्हा याबद्दल त्यांच्या आईला कळलं होतं; पण त्यानं काहीच झालं नाही. कारण- त्यांनी नीरज यांच्याबरोबरच लग्न करणार, असं ठरवलेलं.
अलका व नीरज त्यांच्या लग्नानंतर बराच काळ एकमेकांपासून लांब राहिले आहेत. त्याबद्दल अलका म्हणाल्या, “आम्ही आयुष्यभर दोन वेगळ्या शहरांमध्ये एकमेकांपासून लांब राहिलो. काही वेळा यामुळे आमच्यामध्ये इतकं अंतर यायचं की, दोन-चार दिवस एकमेकांना समजून घेण्यातच जायचे.”