Aalim Hakim on How Much Charged From Bollywood Celebrity: भूमिकेनुसार लूक बदलण्यासाठी कलाकार मेहनत घेताना दिसतात. यामध्ये त्यांच्या वजन कमी-जास्त करण्यापासून ते ड्रेसच्या स्टाइलपर्यंत अनेक गोष्टींचा समावेश असतो. लूक बदलण्यात केसांची भूमिकादेखील महत्वाची असते.
आलिम हाकिम म्हणाला…
केसांच्या वेगळ्या स्टाइलमुळेदेखील लूकमध्ये मोठा फरक दिसतो. आता सेलिब्रिटी हेअरड्रेसर आलिम हाकिमने एका मुलाखतीत तो कलाकारांचे किती पैसे घेतो, याबद्दल वक्तव्य केले आहे. आलिम हाकिम बॉलीवूड इंडस्ट्रीमधील सर्वात लोकप्रिय असा हेअर स्टायलिस्टपैकी एक आहे. नुकतीच आलिम हाकिमने ‘बॉलीवूड बबल’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने तो कलाकारांच्या हेअरड्रेसिंगसाठी किती पैसे घेतो, याबद्दल खुलासा केला.
आलिम हाकिम म्हणाला की तो प्रत्येक सेशनसाठी प्रत्येक ग्राहकाकडून १ लाख रुपये फी घेतो. याबद्दल अधिक बोलताना तो म्हणाला, “ग्राहक कोणताही असो आम्ही ही किंमत ठरलेली आहे. खरंतर ही कमी किंमत आहे. जर एखाद्या व्यक्तीला वाटत असेल की आलिम हाकिमने त्याचे केस कापावेत, तर १ लाख रुपये ही कमी किंमत आहे. प्रत्येक सेशनसाठी ही फी आहे. मी १५ सेशनसाठी ग्राहकांना बोलावतो. त्यानंतर ही किंमत १०-१५ लाख इतकी वाढते. पैसे देण्यास मी कोणावरदेखील बंधन घातले नाही. पण, माझा सल्ला घेण्याची ही फी आहे.” याशिवाय तो १८००० जीएसटी घेतो असेही त्याने सांगितले.
आलिम असेही म्हणाला,” जर मी त्यांना तीन ते पाच लाख रुपये फी मागितली तरी ते देतात. ते तितके पैसे मला देतात कारण-त्यांना त्याचे परिणाम स्क्रीनवर दिसतात. जर त्यांना स्क्रीनवर त्याचा परिणाम दिसला नसता, तर त्यांनी मला तितके पैसे का दिले असते? सेलिब्रिटींचा हेअरड्रेसर म्हणून मी एकटाच नाही. माझ्या अनेक असिस्टंटनी त्यांचा स्वत:चा बिझनेस सुरू केला आहे. लोक त्यांच्याकडे जातात कारण ते विचार करतात की त्यांना मी प्रशिक्षण दिले आहे. सगळेच शाळेत जातात, पण सगळेच दिग्गज बनू शकत नाहीत. जर असे असते तर अमिताभ बच्चन यांचे चित्रपट पाहिल्यानंतर सगळेच त्यांच्याइतके हुशार झाले असते.या सगळ्यासाठी खूप मेहनत लागते. आताच्या तरूण पीढीमध्ये अहंभाव आहे.”
“पाच दशकांपूर्वी सगळ्यात श्रीमंत अभिनेता कोण होता, हे कोणाच्याही लक्षात नाही. पण, सगळ्यांना दिलीप कुमार लक्षात आहेत. मला वाटतं की लोकांनी माझ्या कामासाठी मला ओळखले पाहिजे. “
सामान्या ग्राहकांकडून देखील तो १ लाख रुपये आकारतो का? यावर आलिम म्हणाला, “मी स्वत: सलूनमध्ये काम करत नाही. कारण- मीच केस कापावेत असा लोक आग्रह करतील. आमच्या सलूनमध्ये कायम गर्दी असते. २५०० पासून ते ६००० पर्यंत आमचे दर असतात. आमच्या सलूनमध्ये येऊन केस कापणे सामान्य ग्राहकांसाठी फार महाग नाही”, असे वक्तव्य आलिम हाकिमने केले.