जॉन अब्राहम(John Abraham) ची प्रमुख भूमिका असलेला ‘द डिप्लोमॅट'(The Diplomat) हा सिनेमा १४ मार्चला प्रदर्शित झाला आहे. जॉन अब्राहमबरोबरच या चित्रपटात सादिया, प्राप्ती शुक्ला, जगजित संधू, कुमुद मिश्रा, राम गोपाल बजाज हे कलाकार प्रमुख भूमिकांत दिसत आहेत. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. आता दोन दिवसांत या चित्रपटाची किती कमाई झाली आहे हे जाणून घेऊ…

जॉन अब्राहमच्या ‘द डिप्लोमॅट’ने बॉक्स ऑफिसवर दोन दिवसांत किती केली कमाई?

‘सॅकनिल्क’नुसार चित्रपटाने शुक्रवारी म्हणजे प्रदर्शित झालेल्या दिवशी चार कोटींची कमाई केली होती. शनिवारी कमाईमध्ये १२.५० टक्क्यांची वाढ दिसली. शनिवारी या चित्रपटाने ४.५ कोटींची कमाई केली. त्यामुळे दोन दिवसांत चित्रपटाने ८.५ कोटींची कमाई केल्याचे समोर आले आहे. या चित्रपटाने भारताबाहेर आतापर्यंत ६ कोटींची कमाई केली आहे. एकंदरीत जॉन अब्राहमच्या या चित्रपटाच्या कमाईत वाढ होताना दिसत आहे. मात्र, जर त्याच्या इतर चित्रपटांबरोबर तुलना केली, तर हा वेग कमी आहे.

शनिवारी द डिप्लोमॅट चित्रपटाचे संपूर्ण भारतात एकूण २,६५७ इतके शो झाले होते. चेन्नईमध्ये चित्रपटाला सगळ्यात जास्त प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. तेथे एकूण २३ चित्रपटगृहांमध्ये दाखविला गेलेला हा चित्रपट पाहण्यासाठी ५७ टक्के प्रेक्षकांची उपस्थिती होती. हैदराबादमध्ये ८६ शोंना २६.५० टक्के, तर बेंगळुरूमध्येही २१८ शोंकरिता २६ टक्के प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला. मुंबईत ५१४ शोंना १९.२५ टक्के, तर दिल्ली एनसीआरमध्ये ६४४ शोसाठी १८.७५ टक्के प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, द डिप्लोमॅट हा चित्रपट शिवम नायर यांनी दिग्दर्शित केला आहे. भारतीय राजदूत जे. पी. सिंग आणि उज्मा अहमद यांच्या खऱ्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटाची निर्मिती जे. ए. एंटरटेन्मेंट, वाकोआ फिल्म्स, टी सीरिज, सीता फिल्म, फॉर्च्युन फिल्म्स यांनी केली आहे. आता हा चित्रपट किती कमाई करणार, प्रेक्षकांना हा चित्रपट आणखी किती प्रमाणात भुरळ घालू शकणार ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.