लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ची सध्या संपूर्ण देशभरात चर्चा होत आहे. मात्र, यादरम्यान राजेशिर्के घराण्याच्या वंशजांनी इतिहासाची मोडतोड केल्याचा आरोप करत ‘छावा’ सिनेमावर आक्षेप घेतला होता. कोणताही ऐतिहासिक पुरावा नसताना राजेशिर्केंची बदनामी केली, याचा जाहीर निषेध करत अब्रूनुकसानीचा १०० कोटींचा दावा ठोकणार असं शिर्के यांचे वारसदार पत्रकार परिषदेत म्हणाले होते. यावर आता दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी प्रतिक्रिया देत माफी मागितली आहे. याशिवाय त्यांनी सविस्तर स्पष्टीकरण देत स्वत:ची बाजू देखील मांडलेली आहे.

लक्ष्मण उतेकर एबीपी माझाशी ऑडिओ क्लिपद्वारे संवाद साधताना म्हणाले, “आदरणीय भूषणजी (महाराणी येसूबाईंचे वंशज) सर्वात आधी तुमचा फोन मी नेटवर्क नसल्याने उचलू शकलो नाही…त्यासाठी सॉरी. पण, तुमची पत्रकार परिषद मी पाहिली आणि तुमचा मेसेजही वाचलाय. सर्वप्रथम, नकळत तुमच्या भावना दुखावल्या असतील तर मी तुमची माफी मागतो. तुमच्या मेसेजला मी प्रामाणिकपणे उत्तरही देऊ इच्छितो. सर, सिनेमाच्या सुरुवातीला एक डिस्क्लेमर येतो, त्यात असं नमूद करण्यात आलंय की, हा सिनेमा ‘छावा’ या कादंबरीवर आधारित आहे, ही कादंबरी शिवाजी सावंत यांनी लिहिलेली आहे. ते पुस्तक आजही सर्वत्र उपलब्ध आहे.”

दिग्दर्शक पुढे म्हणाले, “याशिवाय महाराजांवर जी मालिका सुरू होती, त्यामध्ये सुद्धा नावासकट तसंच दाखवण्यात आलं होतं. या चित्रपटामध्ये तर मी त्यांचं आडनाव, गाव काहीच दाखवलेलं नाहीये. गणोजी आणि कान्होजी या सिंगल नावांनी त्यांचा उल्लेख केला आहे. त्यांचं आडनाव काय आहे हे आम्ही चित्रपटात अजिबात दाखवलेलं नाही. ही खबरदारी आम्ही नक्कीच घेतलीये कारण, मला कुणाच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पैसे कमावण्यासाठी चित्रपट बनवला नाही – लक्ष्मण उतेकर

“सर्वात महत्त्वाचं म्हणजे, पैसे कमावण्यासाठी हा चित्रपट बनवण्याची मला गरजच नव्हती साहेब… माझ्याकडे इतर खूप विषय होते, जे भरपूर पैरे कमावून देऊ शकतात. या चित्रपटासाठी आमची संपूर्ण टीम, मी स्वत:, आमचे निर्माते दिनेश विजन या सगळ्यांनी रात्रंदिवस मेहनत घेतली आहे. जवळपास चार वर्षे मेहनत घेऊन आम्ही हा चित्रपट यासाठीच बनवला कारण, आपले छत्रपती संभाजी महाराज काय होते हे आपल्या जगाला कळावं. छत्रपती संभाजी महाराजांवर किती गढूळ लिखाण केलंय, या चित्रपटामार्फत ते पुसण्याचा प्रयत्न केला. आपले राजे काय होते हे लहान मुलांना देखील कळायला पाहिजे हा प्रयास होता. पैसे कमावण्यासाठी इतर खूप विषय आहेत हो…हा विषय पैसे कमावण्यासाठी नव्हताच. आपल्या महाराजांचा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न होता. पुन्हा एकदा भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो आणि हेच सांगेन की, चित्रपटात कुठेही शिर्के या आडनावाचा उल्लेख केला नाही, ना गावाचा उल्लेख आहे. ‘छावा’मध्ये असं काहीच नाहीये…तरीही तुम्हाला काही वाटलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो.” असं लक्ष्मण उतेकर यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.