Bollywood First Laughter Queen Actress : कधी कधी एका हसऱ्या चेहऱ्यामागे अनेक दु:ख, यातना आणि त्रास असतो. मनोरंजन सृष्टीत असे अनेक विनोदी कलाकार आहेत, जे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात कितीही त्रासात असले तरी प्रेक्षकांना हसवण्याचं काम करतात. अशाच एक विनोदी अभिनेत्री होत्या, ज्यांचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय होतं, पण त्यांनी विनोदी अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांना कायम हसवण्याचं काम केलं. या अभिनेत्री म्हणजे उमा देवी.
१९२३ मध्ये उत्तर प्रदेशमधील एका छोट्या गावात जन्मलेल्या उमा देवी २३ व्या वर्षी मुंबईत आल्या. उमा देवी या त्यांच्या जबरदस्त कॉमिक टायमिंगसाठी प्रसिद्ध होत्या. तसंच त्या उत्तम गायिकासुद्धा होत्या. त्यांनी जवळपास ४५ गाणी गायली आहेत. यानंतर लग्न आणि कौटुंबिक जीवनामुळे त्यांना चित्रपटांपासून दूर राहावं लागलं.
नवभारतच्या जुन्या वृत्तात त्यांनी असं म्हटलं होतं, “माझे आई-वडील गावातील जमिनीच्या वादात मारले गेले, तेव्हा मी दोन-अडीच वर्षांची होते. मला माझे आई-वडील कोण होते हेही आठवत नाही. माझा भाऊ ‘हरी’, आठ-नऊ वर्षांचा होता. आम्ही ‘अलिपूर’ नावाच्या गावात राहात होतो. एक दिवस माझा भाऊही मारला गेला, तेव्हा मी चार-पाच वर्षांची होते.”
गायक होण्यासाठी त्यांनी एकेदिवशी घरातून पळून जाऊन मुंबई गाठली. १९४५ साली त्यांनी नौशाद यांचं दार ठोठावलं. माझं गाणं ऐका, मला एक संधी द्या; नाहीतर तुमच्या बंगल्याच्या मागच्या समुद्रात मी जीव देईन अशी धमकी देऊन त्यांनी गाणं सादर केलं. नौशाद अली यांना गाणं आवडलं आणि उमा देवी यांचं आयुष्य बदललं.
उमा देवी यांना दिलीप कुमार यांनीच दिलं ‘टुनटुन’ नाव
मधल्या काळात उमा देवी इंडस्ट्रीपासून दूर राहून कुटुंबाची जबाबादारी सांभाळू लागल्या. १९५० च्या दशकात नौशाद अली यांनी उमा देवी यांच्यात असलेल्या कॉमेडीचं टायमिंग पाहून त्यांना अभिनय क्षेत्रात जाण्याचं सुचवलं. मग दिलीप कुमार यांच्या ‘बाबुल’ सिनेमात त्यांनी पहिल्यांदा काम केलं. दिलीप कुमार यांनीच त्यांना ‘टुनटुन’ नाव दिलं.
आयुष्यभर प्रेक्षकांना खदखदून हसवणाऱ्या या अभिनेत्रीच्या आयुष्याच्या शेवटचा प्रवास खूपच खडतर होता. वृद्धापकाळात त्यांची देखभाल करण्यासाठीही कोणी नव्हतं. तसंच तेव्हा आजारावर उपचार करण्याइतके पैसेदेखील त्यांच्याकडे नव्हते.
आयुष्य इंडस्ट्रीला दिलं, पण शेवटी कोण विचारायलाही आलं नाही : उमा देवी
याबद्दल त्यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’साठी साधलेल्या संवादात त्यांचं दु:ख व्यक्त केलं होतं. “संपूर्ण आयुष्य इंडस्ट्रीला दिलं, पण शेवटी कोण विचारायलाही आलं नाही. माझं दु:ख मी हसून घेतलं. लोकांनी दुर्लक्ष केलं”, असं म्हणत त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्यानंतर २००३ साली वयाच्या ८० व्या वर्षी त्यांचं निधन झालं.