बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि इतर काही अभिनेत्रींना गंडा घालणाऱ्या सुकेश चंद्रशेखरबद्दल सध्या बऱ्याच गोष्टी समोर येत आहेत. केवळ जॅकलिन आणि नोरा फतेहीच नव्हे तर चाहत खन्ना, निक्की तांबोळी, सोफिया सिंह या अभिनेत्रींची नावं समोर आली आहेत. काही दिवसांपूर्वी जॅकलिनबरोबर चाहत खन्नानेही सुकेश चंद्रशेखरविरोधात जबाब नोंदवला होता. यावेळी तिने सुकेश चंद्रशेखरने प्रपोज करत लग्नाचे वचन दिल्याचा दावा केला होता. आता मात्र सुकेश चंद्रशेखरने हा दावा फेटाळला आहे. मी चाहतला कधीही प्रपोज केलेले नाही, असे त्याने यात नमूद केले आहे.

सुकेश चंद्रशेखर हा २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणी तुरुंगात आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून याबद्दल विविध खुलासे होताना दिसत आहे. सुकेश चंद्रशेखर हा सध्या दिल्लीच्या मंडोली तुरुंगात बंद आहे. नुकतंच सुकेशने तुरुंगातून एक पत्र लिहिले आहे. त्या पत्रात त्याने दावा केला आहे की, “मी चाहत खन्नाला कधीही प्रपोज केलेले नाही. मी आणि ती एका चित्रपट निर्मितीच्या ऑफरसंदर्भातील व्यावसायिक मीटिंगसाठी भेटलो होतो. तिने ही बाब ईडीच्या जबाबातही नोंदवली आहे.”
आणखी वाचा : “जॅकलिनवर माझे प्रेम, त्यामुळेच मी…” २०० कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी सुकेश चंद्रशेखरचे पत्र

“मला आधीपासून विवाहित असलेल्या किंवा मुलं असलेल्या महिलेला डेट करण्यात किंवा त्यांच्याबरोबर राहण्यात रस नाही. मी चाहतसारखा गोल्ड डिगर नाही. चाहत आणि निक्की या दोघांशी माझे संबंध फक्त अन् फक्त व्यावसायिक कारणांसाठी होते. यासाठी आम्ही एकमेकांना अनेकदा भेटायचो. त्यासाठी मी काही पैसेही दिले होते.”

आणखी वाचा : “नोरा फतेही जॅकलिनचा राग करायची, तिने अनेकदा…” सुकेश चंद्रशेखरचा धक्कादायक खुलासा

“मी तिला तिहार जेलमध्ये फसवून आणल्याचा दावा चाहतने केला आहे. पण जेव्हा कोणीही व्यक्ती जेलमध्ये प्रवेश घेते तेव्हा त्याला लगेचच कळते. ती १० वर्षांची लहान मुलगी आहे का? हल्ली तर १० वर्षांच्या मुलांनादेखील जेल कसा आहे, हे माहिती असते. चाहत ही स्पष्टपणे खोटं बोलत आहे. ती सध्या विविध कथा रचून सांगत आहे.” असेही त्याने पत्रात म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान सुकेशवर २०० कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे. जॅकलिन, नोरा यांच्यासारख्या अनेक अभिनेत्रींना त्याने महागड्या भेटवस्तू देऊन स्वतःच्या जाळ्यात ओढले होते. या दोघींशिवाय सारा अली खान, चाहत खन्ना यांचेही नाव जोडले जाते. सुकेशने फोर्टिस हेल्थकेअरचे माजी प्रमोटर शिविंदर मोहन सिंह यांच्या पत्नी अदिती सिंह यांच्यासह अनेकांची फसवणूक केली आहे.