Deepika Padukones reel becomes most viewed on Instagram: बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या तिच्या आठ तासांच्या कामाच्या मागणीमुळे मोठ्या चर्चेत आहे. तिच्या या मागणीमुळे तिच्या हातून काही मोठे प्रोजेक्ट गेल्याचे म्हटले जात आहे.

‘ओम शांती ओम’ या चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या दीपिकाने बॉलीवूडच्या अनेक मोठ्या चित्रपटांत काम केले. तिच्या भूमिका आणि ती ज्या चित्रपटात असेल ते चित्रपट मोठे गाजले. यामध्ये ‘ओम शांती ओम’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘पद्मावत’, ‘पिकू’, ‘यह जवानी है दिवानी’, ‘हॅपी न्यू इअर’, ‘बिल्लू’, ‘पठाण’, ‘जवान’, अशा अनेक चित्रपटांचा समावेश आहे.

गरोदर असताना काही काळासाठी दीपिकाने कामातून ब्रेक घेतला होता. मुलीच्या जन्मानंतर ती कधी कामावर परतणार, ती कोणत्या प्रोजेक्टमध्ये दिसणार अशी उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. आता यादरम्यान, दीपिकाची सोशल मीडियावरील एक रील मात्र मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. इन्स्टाग्रामवरील सर्वात जास्त पाहिली जाणारी ही रील ठरली आहे.

दीपिका पादुकोणच्या रीलने सर्व रेकॉर्ड मोडले

दीपिकाने ९ जूनला एक रील बनवली होती. एका हॉटेलचे प्रमोशन करणारी ही रील होती. दीपिकाने या रीलमध्ये हॉटेल चैन हिल्टनचे प्रमोशन केले आहे. यासाठी दीपिकाने मानधन घेतले होते. ९ जून रोजी शेअर करण्यात आलेल्या रीलने याआधीचे इन्स्टाग्रामवरील सर्व रेकॉर्ड मोडले आहेत.

हा व्हिडीओ हिल्टनच्या ‘इट मॅटर्स व्हेअर यू स्टे’ या जागतिक मोहिमेचा भाग आहे, ज्यामध्ये दीपिका ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून काम करते. हार्दिक पांड्या आणि क्रिस्टियानो रोनाल्डोसह इतर प्रसिद्ध कलाकार, खेळाडू यांच्या कंटेंटला मागे टाकत रीलने दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत हा टप्पा गाठला. याआधी, सर्वाधिक पाहिले गेलेल्या रीलमध्ये हार्दिक पांड्याच्या दोन व्हिडीओंचा समावेश आहे. बीजीएमआयच्या प्रमोशनल व्हिडीओला १.६ अब्ज व्ह्यूज आणि स्मार्टफोनसाठीच्या प्रमोशनल व्हिडीओला १.४ अब्ज व्ह्यूज मिळाले आहेत.

दीपिकाच्या या रीलवर अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. तिचे कौतुक केले आहे. तसेच, एखाद्या रीलला इतके व्ह्यूज मिळणे, हे अत्यंत दुर्मीळ असल्याच्या काही पोस्टदेखील केल्या आहेत.

दीपिकाची ही रील म्हणजे ब्रँडसाठी केलेले काम असले तरी त्याला अपेक्षेहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. इन्स्टाग्रामवर दीपिकाचे ८० मिलियन फॉलोअर्स आहेत. अभिनेत्री भारतातील सर्वात जास्त फॉलोअर्स असलेल्या व्यक्तींपैकी एक आहे.

दरम्यान, अभिनेत्री आता आगामी काळात कोणत्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.