दिग्दर्शक दिबाकर बॅनर्जींनी दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतबरोबर ‘डिटेक्टिव्ह व्योमकेश बक्षी’ या चित्रपटात काम केलं होतं. हा चित्रपट फारसा यशस्वी झाला नाही, पण यात सुशांतने केलेल्या कामाचं खूप कौतुक झालं होतं. ‘लव्ह सेक्स और धोका २’ या चित्रपटाच्या निमित्तानं दिलेल्या मुलाखतीत आता दिबाकर यांनी सुशांतचे निधन आणि त्यानंतर निर्माण झालेल्या वातावरणावर आपलं मत मांडलं आहे.

जून २०२० मध्ये सुशांतचा मृतदेह त्याच्या घरातून सापडला होता. त्यावेळी त्याने आत्महत्या केल्याचं म्हटलं गेलं, नंतर मात्र सुशांतबरोबर काहीतरी घडलं असावा असा संशय असल्याने या प्रकरणाचा तपास आधी मुंबई पोलिसांकडे आणि नंतर सीबीआयकडे सोपवण्यात आला. या संपूर्ण प्रकरणात सुशांतला कोणीही मिस करताना दिसलं नाही, असं दिबाकर यांनी म्हटलं आहे.

आपल्या मुलीचे वडील रवी किशन असल्याचा दावा करणाऱ्या महिलेविरोधात प्रीती किशन यांची तक्रार; म्हणाल्या, “२० कोटी…”

दिबाकर यांनी सुशांतच्या निधनानंतरचे दिवस आठवले. एका तरुण अभिनेत्याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्याऐवजी लोकांचे लक्ष त्याच्या मृत्यूपर्यंत कारणीभूत असलेल्या गोष्टींवर होते. “त्याच्या निधनानंतर त्याच्या मृत्यूबद्दल बऱ्याच गोष्टी सुरू होत्या, पण मी तेव्हा येणाऱ्या बातम्यांमुळे मी या सर्व गोष्टींपासून दूर गेलो. मी सगळं ऐकत होतो, पण एका तरुण अभिनेत्याचं निधन झालंय, असं म्हणताना मला कुणीच दिसलं नाही. मी माझ्या आजुबाजूला कुणालाच त्याच्या निधनावर शोक व्यक्त करताना पाहिलं नाही. लोक त्याच्या निधनात मसालेदार गॉसिप शोधत होते, ते सगळं पाहिल्यावर मला त्या परिस्थितीपासून दूर जावं लागलं, कारण कुणीही सुशांतला गमावल्याबद्दल दुःख व्यक्त करत नव्हतं,” असं दिबाकर म्हणाले.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी व राज कुंद्राची ९७.७९ कोटी रुपयांची संपत्ती ईडीने केली जप्त

दिबाकर म्हणाले की सुशांतच्या यशाबद्दल कोणीही बोलत नव्हतं, सगळे फक्त ‘षड्यंत्र, ड्रग्ज, खून’ याबाबत बोलत होते. “त्याच्या निधनानंतर शोकसभा कुठे झाल्या? त्याच्या चित्रपटांबद्दल कुठे बोललं गेलं? जे लोक त्याच्यावर प्रेम करत होते, त्यांनी त्याच्या चित्रपटांच स्क्रिनींग ठेवायला पाहिजे होतं. आपण त्याच्या चांगल्या आठवणी का जपत नाही?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. लोकांनी फक्त आपलं दुःख विसरायला त्याच्या निधनाची चर्चा केली, त्यात शोक दिसलाच नाही, असं स्पष्ट मत त्यांनी मांडलं.