Dilip Kumar : बॉलीवूडची एव्हरग्रीन जोडी म्हणून दिवंगत अभिनेते दिलीप कुमार आणि सायरो बानो यांच्याकडे पाहिलं जायचं. एकेकाळी दिलीप कुमार बॉलीवूडचे मोस्ट एलिजिबल बॅचलर म्हणून ओळखले जायचे. मात्र, कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे अभिनेते वयाच्या ४४ व्या वर्षी बोहल्यावर चढले. तेव्हा सायरा बानो फक्त २२ वर्षांच्या होत्या. त्यांच्या प्रेमकहाणीचे अनेक किस्से चर्चेत आहेत. मात्र, या दोघांच्या नात्यात एक असा कठीण प्रसंग आला ज्यामुळे सायरा बानो पूर्णपणे बिथरल्या गेल्या होत्या.

दिलीप कुमार यांनी लग्नाच्या १६ वर्षांनंतर अस्मा रहमान या महिलेशी गुपचूप लग्न केलं होतं. सर्वात दु:खद गोष्ट म्हणजे, सायरा बानो यांना पतीच्या दुसऱ्या लग्नाची बातमी वर्तमानपत्रातून समजली होती. ही गोष्ट वाचल्यावर त्यांना सुरुवातीला खूप मोठा धक्का बसला. याबद्दल दिलीप कुमार यांनी ‘द सबस्टन्स अँड द शॅडो: ॲन ऑटोबायोग्राफी’ या त्यांच्या पुस्तकात लिहिलं आहे. या घटनेचा पुस्तकात उल्लेख करत अभिनेत्याने ‘मी स्वत:ला कधीच माफ करू शकणार नाही’ असं म्हटलं आहे.

हेही वाचा : भर कार्यक्रमात प्रपोज, रोमँटिक डान्स अन्…; लग्नाला २५ वर्षे पूर्ण होताच माधुरीच्या पतीची खास पोस्ट, डॉ. नेने म्हणाले…

दिलीप कुमार यांना या गुपचूप केलेल्या लग्नामुळे प्रचंड पश्चाताप झाला होता. हैदरबादमध्ये एका क्रिकेट सामन्यादरम्यान अभिनेते पहिल्यांदा अस्माला भेटले होते. एक स्टार अभिनेता आणि त्याची फॅन अशाप्रकारचं संभाषण दोघांमध्ये पहिल्या भेटीत झालं. मात्र, हळुहळू त्यांचं संभाषण एका वेगळ्या दिशेला गेलं. दिलीप यांची अस्माशी ओळख त्यांच्या बहि‍णींनी करून दिली होती. यावेळी ती विवाहित असून तिला ( अस्मा रहमान ) तीन मुलं असल्याचं देखील त्यांना समजलं होतं. अस्मा आणि तिचा पती दोघे मिळून सतत अभिनेत्याच्या आसपास असायचे. “मी त्या दोघांच्या षडयंत्रापासून पूर्णपणे अनभिज्ञ होतो आणि त्या दोघांनी मोठ्या हुशारीने सगळ्या गोष्टी घडवल्या. स्वतःच्या स्वार्थासाठी आणि माझ्याकडून कमिटमेंट मिळवण्यासाठी अतिशय चतुराईने सगळी वातावरण निर्मिती करण्यात आली” असं दिवंगत अभिनेते दिलीप कुमार यांनी स्वत:च्या बायोग्राफीत लिहिलं आहे.

दिलीप कुमार यांनी १९८२ मध्ये अस्माशी गुपचूप लग्न केलं होतं. ही बातमी जेव्हा सायरा बानो यांच्यासमोर आली तेव्हा त्यांना खूप मोठा धक्का बसला. सायरा बानो आणि दिलीप कुमार यांच्या नात्यामधला हा सर्वात मोठा निर्णायक क्षण होता. “मी स्वत:ला कधीच माफ करू शकणार नाही. कारण, मी सायरा प्रचंड वेदना दिल्या. तिच्या विश्वासाला तडा गेला आणि ती पूर्णपणे खचून गेली.” असं त्यांनी पुस्तकात म्हटलं आहे.

हेही वाचा : दिलीप कुमार यांना लग्नानंतर काही दिवसांनी ‘पहिलं प्रेम’ असलेल्या मधुबालाने भेटायला का बोलावलं होतं? ‘अशी’ होती सायरा बानोंची प्रतिक्रिया

Dilip Kumar
दिलीप कुमार व सायरा बानो ( फोटो सौजन्य : इंडियन एक्स्प्रेस )

अखेर दिलीप कुमार यांनी स्वत:हून सायरा बानो यांच्यासमोर त्यांच्याकडून घडलेली ‘गंभीर चूक’ कबूल केली अन् अस्माला अधिकृतपणे घटस्फोट देण्यासाठी काही वेळ मागितला.

“सायरा त्यावेळी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. माझी चूक सुधारण्यासाठी मी तिच्याकडे काही वेळ मागितला. ही आमच्या १६ वर्षांच्या लग्नाची कसोटी होती. आमच्या प्रेमाचं पावित्र्य मला पुन्हा आणायचं होतं.” असं त्यांनी पुस्तकात लिहिलं आहे. अस्माशी घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण होण्याआधीच दिलीप कुमार यांनी सायराला वचन दिलं. त्यांच्यात वचनबद्ध करार झाला होता. “सायरा यांच्या पालकांना दिलेलं वचन मी पूर्ण करेन आणि दुसऱ्या लग्नावर कधीच चर्चा होणार नाही” या करारावर दिलीप कुमार यांनी स्वाक्षरी केली. या घटनेनंतर त्यांनी सायरा यांची साथ शेवटपर्यंत सोडली नाही. २०२१ मध्ये दिलीप कुमार यांचं निधन झालं.

Story img Loader