Dimple Kapadia Nana Patekar : डिंपल कपाडिया आणि नाना पाटेकर यांनी काही चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं. दोघांची चांगली मैत्रीही आहे. पण डिंपल यांनी एका मुलाखतीत नाना पाटेकर यांना किळसवाणे आणि आपली नकारात्मक बाजू लपवून ठेवणारे म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्याने खळबळ उडाली होती.

नाना पाटेकर व डिंपल कपाडिया यांनी ‘प्रहार: द फायनल अटॅक’, ‘अंगार’ आणि ‘क्रांतिवीर’ सारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं. त्यानंतर बरीच वर्षे त्यांनी एकमेकांबरोबर स्क्रीन शेअर केली नाही. २०१० मध्ये ‘तुम मिलो तो सही’ या चित्रपटात पुन्हा एकदा त्यांना एकत्र काम करण्याची संधी मिळाली. ‘एनडीटीव्ही’च्या एका मुलाखतीत डिंपल यांना बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकदा नाना पाटेकर यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव विचारण्यात आला होता. त्या प्रश्नाचं उत्तर देताना डिंपल नाना यांच्याबद्दल जे म्हणाल्या होत्या, त्याची प्रचंड चर्चा झाली होती.

नाना किळसवाणे वाटतात – डिंपल कपाडिया

‘हिंदुस्थान टाइम्स’च्या वृत्तानुसार, “मला नाना घृणास्पद, नकोसे वाटतात,” असं डिंपल नानांबद्दल म्हणाल्या होत्या. नाना पाटेकरांबद्दल चांगल्या आणि वाईट गोष्टी त्यांना विचारण्यात आल्या. “चांगल्या मार्गाने आणि वाईट दोन्ही बाजूने. खरं तर ते खूप प्रतिभावान आहेत, यात मला तिळमात्र शंका नाही. त्यांच्यासारख्या प्रतिभावान कलाकारांच्या कितीही मी चुका माफ करू शकते. मला त्यांचा अभिनय इतका आवडतो की त्यासाठी मी माझा जीवही देऊ शकते,” असं वक्तव्य डिंपल यांनी केलं होतं.

नानांची भयंकर बाजू मी पाहिलीय – डिंपल कपाडिया

डिंपल यांनी नाना पाटेकर यांच्या नकारात्मक बाजूबद्दल म्हणाल्या, “एक व्यक्ती म्हणून माझ्याबरोबर नाना खूप चांगले वागतात, आम्ही दोघे चांगले मित्रही आहोत, पण मी त्यांची भयंकर बाजूही पाहिली आहे. त्यांची नकारात्मक बाजू. आपल्या सर्वांची अशीच एक नकारात्मक बाजू असते, जी आपण सर्वांपासून लवपून ठेवतो. तशीच नकारात्मक बाजू नानांची आहे आणि त्यांनी ती खूप चांगल्या पद्धतीने लपवून ठेवली आहे,” असं डिंपल म्हणाल्या होत्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डिंपल कपाडिया यांनी नाना पाटेकरांबद्दल केलेल्या या विधानाची खूप चर्चा झाली होती. नाना खूप चांगले मित्र असले तरी त्यांचीही एक भयंकर नकारात्मक बाजू आहे, असं वक्तव्य डिंपल यांनी केलं होतं.