अभिनेते नाना पाटेकर खूप चिडतात, असं म्हटलं जातं. ते दिग्दर्शक किंवा सहकलाकारांवर रागावल्याचे अनेक किस्से तुम्ही ऐकले असते. स्वतः नानादेखील अनेक किस्से सांगत असतात. ज्येष्ठ अभिनेते मकरंद देशपांडे यांनी नाना पाटेकर दिग्दर्शित ‘प्रहार: द फायनल अटॅक’ या चित्रपटात काम करतानाचा अनुभव सांगितला. तसेच शूटिंग पूर्ण केल्यावर आपण नानांबरोबर जेवायला जाण्यास नकार दिला होता, असा खुलासा मकरंद यांनी केला.

कुनिका सदानंदशी तिच्या पॉडकास्टवर बोलताना मकरंद यांनी सांगितलं की सुरुवातीला त्यांना या चित्रपटातील एका कमांडोच्या भूमिकेसाठी घेण्यात आलं होतं. पण नंतर मात्र त्यांना माधुरी दीक्षितचा भाऊ म्हणून पुन्हा सिनेमात कास्ट केलं. कारण ते कावीळमधून नुकतेच बरे झाले होते. “नानांनी सांगितलं की मी कमांडो ट्रेनिंग घेऊ शकत नाही कारण मी मरू शकतो. म्हणून, त्यांनी मला माधुरीच्या भावाची भूमिका करण्यास सांगितलं. ती भूमिका ड्रग्जच्या आहारी गेलेल्या व्यक्तीची होती. माझे फक्त दोन सीन होते, मी ते वाचले आणि मला वाटलं वाह, काय सीन आहे,” असं मकरंद म्हणाले.

एक प्रसंग आठवत मकरंद देशपांडेंनी सांगितलं की शूटिंगच्या धावपळीत ते नाना पाटेकर यांना रिहर्सल करण्यासाठी किंवा सीनवर चर्चा करण्यासाठी भेटू शकले नाहीत. मकरंद म्हणाले, “मला खूप राग येत होता, आणि एक उत्साही थिएटर कलाकार म्हणून मला खूप तयारी करावी लागली. पण नाना तसं काहीच करत नव्हते. मला आठवतं की नानांची जीप एका बिल्डिंगबाहेर उभी होती, मी त्यांना शोधण्यासाठी आत शिरलो. मला नंतर समजलं की ते घर प्रहारचे सिनेमॅटोग्राफर देबू देवधर यांचे आहे.” पुढे नाना यांना मकरंद का आले आहेत हे समजल्यावर ते हसले होते. “नाना फक्त हसले आणि म्हणाले की त्यांना माझ्यावर विश्वास आहे, आणि म्हणूनच मला सिनेमात घेतलंय. पण मला वाटत होतं की ते पूर्णपणे चुकीचे आहेत,” असं मकरंद यांनी नमूद केलं.

मी १५ मिनिटं वाट पाहिली – मकरंद देशपांडे

पहिला शॉट पूर्ण होईपर्यंत नाना चुकत आहेत, यावर मकरंद यांचा ठाम विश्वास होता. “मी १५ मिनिटं वाट पाहिली. मी माझ्या भूमिकेची तयारी आधीच केली होती. मी माझे केस सरळ केले होते, मी ड्रग्ज व्यसनी दिसण्यासाठी स्वतःच माझा शर्ट तसा तयार केला. मी तिथे आलो आणि नाना तिथे नव्हतेच. अखेर जेव्हा ते तिथे आले तेव्हा मी त्यांना सांगितलं की मी तयार होतो आणि या सीनमध्ये काय करायचंय ते मी सांगतो” असं मकरंद यांनी नमूद केलं. यावर नाना हसत म्हणाले, “मी अजूनही दिग्दर्शक आहे, बरोबर ना?”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मकरंद यांनी जेवायला जाण्यास दिलेला नकार

‘प्रहार’च्या शूटिंगमधील आणखी एक किस्सा मकरंद देशपांडे यांनी सांगितला. सिनेमातील एका एका विशिष्ट दृश्यात माधुरी दीक्षितला सुधारणा करायची होती, पण नाना पाटेकरांनी त्यासाठी नकार दिला. “नानांनी माधुरीकडे पाहिले आणि तिला काहीही सुधारणा करू नकोस नाहीतर मी तिच्यावर ओरडणार असं सांगितलं,” असं मकरंद म्हणाले. “आम्ही दुपारच्या जेवणाआधी सगळे सीन पूर्ण केले आणि पॅक-अप झाल्यावर नानांना एकत्र जेवायला जायचं होतं. पण मी त्यांच्याबरोबर जेवायला जाण्यास नकार दिला आणि सांगितलं की त्यांनी मला वेळ दिला नाही, त्यामुळे मी माझा वेळ देणार नाही,” असं मकरंद देशपांडे यांनी नमूद केलं.