पटकथा लेखक आणि प्रसिद्ध दिग्दर्शक सईद अख्तर मिर्झा यांनी भारतीय चित्रपटसृष्टीला बरेच उत्तम चित्रपट दिले आहेत. ‘नसीम’ आणि ‘अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यो आता हैं’ हे त्यांचे चित्रपट खूप गाजलेत. याशिवाय त्यांना ‘नुक्कड’ आणि ‘इंतजार’ अशा मालिकांचं दिग्दर्शनही केलं आहे. पण सध्या ते नुकत्याच इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आहेत.

‘इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत सईद मिर्झा यांनी दिवंगत दिग्दर्शक कुंदन शाह यांच्या आठवणींना उजाळा देत सध्याची चित्रपटसृष्टी आणि वादग्रस्त पण बॉक्स ऑफिसवर हिट ठरलेल्या विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटावर आपलं मत मांडलं. काही दिवसांपूर्वीच गोवा येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवादरम्यान ज्युरी हेड नदाव लॅपिड यांनी या चित्रपटाला अश्लील आणि प्रपोगंडा प्रचारक असं म्हटल्यानंतर हा चित्रपट पुन्हा चर्चेत आला आहे.

आणखी वाचा-‘काश्मीर फाइल्स’वरील टीकेनंतर पहिली प्रतिक्रिया काय होती, अनुपम खेर म्हणाले, “हिंसक होती, मनात आलं की…”

‘द कश्मीर फाइल्स’बद्दल बोलताना सईद मिर्झा म्हणाले, “माझ्यासाठी ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट म्हणजे कचरा आहे. पण मग काश्मिरी पंडितांच्या समस्या म्हणजे कचरा आहेत का? तर नाही. असं नाही अजिबात नाही. त्यांच्या समस्या खऱ्याच आहेत. पण हे फक्त काश्मिरीं हिंदूंनाच सहन करावं लागलं का? तर नाही त्यात काश्मिरी मुस्लीमही आहेत. जे गुप्तचर संस्था, तथाकथित राष्ट्रीय हितसंबंध असलेली राष्ट्रे आणि सीमेपलीकडून पगार घेणारे लोक, जे सतत गोंधळ निर्माण करत आहेत, या सगळ्यांच्या षडयंत्रात अडकले आहेत. मुद्दा बाजू घेण्याचा नाही. माणूस व्हा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा.”

आणखी वाचा-इस्राइलचा जन्म ते लष्करात काम, ‘द काश्मीर फाइल्स’बद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे इफ्फीचे ज्युरी हेड नदाव लॅपिड नक्की कोण?

याच मुलाखतीत सईद मिर्झा यांनी दिवंगत दिग्दर्शक कुंदन शाह यांनी २००२ मध्ये झालेल्या गुजरात दंगलीसंदर्भात माफी मागितल्याची आठवण सांगितली. ते म्हणाले, “त्यांनी गुजरात दंगलीसंदर्भात माझी माफी मागितली होती. ते मला म्हणाले, मी हिंदू आहे आणि कोणीतरी याची जबाबदारी घ्यायला हवी अर्थात दुसरं कोणी ती घेणार नाही मला माहीत आहे. त्यावर मी त्यांना म्हटलं आपण २१ व्या शतकात जगतो आणि तुम्ही मी हिंदू आणि तू मुस्लीम असं बोलत आहात? त्यावर ते म्हणाले, तेच तर, जे तुम्ही नाकारत आहात तेच माझ्या देशाचं सत्य आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सईद मिर्झा यांनी या मुलाखतीत, “सध्या देशभक्ती हे पैसा कमवण्याचं साधन ठरत आहे आणि हे जगातले सर्वच देश करत आहेत.” अशी खंतही व्यक्त केली. दरम्यान सईद मिर्झा यांच्या कामाबद्दल बोलायचं तर त्यांनी लिहिलेला ‘कर्मा कॅफे’ हा लघुपट २०१८ मध्ये प्रदर्शित झाल होता.