Director Suneel Darshan Talks About kareena kapoor : करीना कपूर बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने आजवर अनेक चित्रपटांत विविध भूमिका साकारल्या आहेत. वैविधपूर्ण भूमिका साकारणाऱ्या करीनाने मात्र एकदा एका चित्रपटातील भूमिका निवडताना चूक केल्याचं लोकप्रिय दिग्दर्शकाने सांगितलं आहे. त्यांनी करीना कपूर व प्रियांका चोप्रा या दोघींनी एकत्र काम केलेल्या ऐतराज चित्रपटाबद्दल सांगितलं आहे. यादरम्यान त्यांनी करीनाचा एक किस्सा सांगितला आहे.

अब्बास मस्तान यांनी दिग्दर्शित केलेला ‘ऐतराज’ चित्रपट २०००३ साली प्रदर्शित झाला होता. त्यामध्ये करीना कपूर, अक्षय कुमार प्रियांका चोप्रा मुख्य भूमिकांत झळकले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. त्यामध्ये अक्षय कुमारने नायकाची, करीनाने नायिकेची, तर प्रियांका चोप्राने यामध्ये खलनायिकेची भूमिका साकारली होती. त्यावेळी यशाच्या शिखरावर असताना प्रियांकाने खलनायिकेची भूमिका साकारत आव्हानात्मक काम केलं. परंतु, त्यातील तिच्या कामाचं अनेकांनी कौतुक केल्याचं म्हटलं जातं. अशातच आता लोकप्रिय दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी करीना कपूरचा किस्सा सांगितला आहे.

करीना कपूरबद्दल काय म्हणाले सुनील दर्शन?

‘बॉलीवूड बबल’शी संवाद साधताना ते म्हणाले, “काही वेळा कलाकार चुकीचा निर्णय घेतात. पूर्वी नकारात्मक भूमिकांना कमी लेखलं जायचं. त्यात प्रियांका चोप्रानं ‘ऐतराज’मध्ये अमरीश पुरी यांच्या पत्नीची भूमिका साकारल्यानंतर मला तो शशिकलासारख्या भूमिकांचा प्रकार वाटला होता; पण वेळ बदलत गेली, तसा लोकांचा दृष्टिकोनही बदलला आणि मला वाटलं बेबोनं (करीना) खूप मोठी चूक केली.”

दिग्दर्शक पुढे म्हणाले, “करीनाला पहिल्यांदा या चित्रपटासाठी विचारणा झाली होती. त्यामुळे ती प्रियांकानं चित्रपटात साकारलेली भूमिकाही करू शकली असती. पण, बेबो बेबो आहे. तिनं ती भूमिका गमावली. कारण- तिनंच नकार दिला होता. तिनं नायिकेची भूमिका साकारण्याचा निर्णय घेतला.”

दिग्दर्शकांनी पुढे प्रियांकाचं कौतुक केलं. ते म्हणाले, “प्रियांका त्यावेळी यशाच्या शिखरावर होती. तिला जे हवं असायचं, ती त्याच्यामागे धावायची. तिनं अशी भूमिका साकारली, जी त्या काळी सामान्य भूमिकांसारखी नव्हती. तरीसुद्धा तिनं त्या भूमिकेला न्याय दिला.”

दरम्यान, असे म्हटले जाते की, करीना कपूर व प्रियांका चोप्रा यांच्यामध्ये पूर्वी काही वाद होते. एकदा तर करीनाने प्रियांकाला ‘फॅशन’ चित्रपटासाठी मिळालेल्या पुरस्काराबद्दल प्रश्न उपस्थित केला होता, असेही म्हटले जाते. परंतु, नंतर २०१९ मध्ये करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात दोघींनीही एकत्र हजेरी लावली होती. त्यावेळी दोघीही एकमेकींशी गप्पा मारताना व हसताना पाहायला मिळाल्या होत्या.