Veteran Director Says Vidya Balan, Hrithik Roshan Changed after Success : सिनेमाच्या कथेपेक्षा सिनेमाची कमाई अधिक महत्त्वाची असल्याचं काहींना वाटतं असं बॉलीवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शकांनी म्हटलं आहे. एका मुलाखतीमध्ये त्यांनी बॉलीवूडमधील कामाच्या पद्धतींबद्दल तसेच दिग्गज कलाकारांबद्दल त्यांचं मत मांडलं आहे.
‘मुन्ना भाई एमबीबीएस’, ‘३ इडियट्स’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांची निर्मिती करणारे दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांनी नुकतच बॉलीवूडबद्दल त्यांचं मतं मांडलं आहे. ‘स्क्रीन’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी याबाबत सांगितलं आहे.
विधू विनोद चोप्रा यांना मुलाखतीमध्ये त्यांच्या चित्रपटात ते नवीन लोकांना संधी देतात याबाबत विचारण्यात आलेलं. यावर दिग्दर्शक म्हणाले, “नवीन लोकांमध्ये निरागसता असते. ते कमी भ्रष्टाचारी असतात. माझ्याबरोबर काम केलेले लोक आज खूप मोठे चित्रपटनिर्माते, दिग्दर्शक झाले आहेत”, त्यांनी यावेळी कोणाचंही नाव न घेता त्यांचं मत मांडलं.
हृतिक रोशन, विद्या बालन यांच्याबद्दल काय म्हणाले विधू विनोद चोप्रा?
विधू विनोद चोप्रा पुढे म्हणाले, “मी बऱ्याच लोकांसह काम केलं आहे आणि नंतर त्यांच्यामध्ये बदल होताना पाहिलं आहे. ‘मिशन काश्मीर’ हा हृतिक रोशन, विद्या बालन, बोमन इराणी यांचा पहिला चित्रपट होता. याची खूप मोठी यादी आहे. मला आता आठत नाही, पण यशस्वी झाल्यानंतर ते बदलले, त्यामुळे मला अशी लोकं आवडतात ज्यांची काही ओळख नसते, कारण जेव्हा तुम्ही प्रसिद्ध होता तेव्हा तुमच्यामध्ये बदल होतात.”
विधू विनोद चोप्रा यांनी दिग्दर्शक व कलाकार यांना चित्रपट कसा आहे याने काही फरक पडत नसल्याचं म्हटलं आहे. कथा कशी आहे यापेक्षा जर ती चालत असेल तर ते त्याकडेच लक्ष देतात असं सांगितलं आहे. ते पुढे म्हणाले, “लोकांना फक्त चित्रपट हिट होण्याशी घेणं देणं असतं. कोणाकडेही दृष्टी नाहीये, कोणालाही कलाकृती बनवताना जी गंमत असते त्याबद्दल काही वाटत नाही. ते ४०० कोटींचं बॉक्स ऑफिस कलेक्शन असलेला एक चित्रपट बनवतात आणि नंतर अचानक स्वत:चा वेगळा मार्ग निवडतात.”
विधू विनोद चोप्रा पुढे उदाहरण देत म्हणाले, “मी एका निर्मात्याला ओळखायचो जो बोलताना खूप अदबीने वगैरे बोलायचा, पण अचानक एक दिवस त्याच्या वागण्यात मला बदल जाणवला, तेव्हा मी त्याला तुझा कोणता चित्रपट हिट झाला आहे का याबाबत विचारलं. यावर तो म्हणाला, सर तुम्हाला माहीत आहे माझा चित्रपट सुपरहिट ठरला. मी म्हटलं, मला याबद्दल काही कल्पना नव्हती. मला फक्त एवढंच माहीत होतं की, यामुळे त्याला मोठा आर्थिक फायदा झाला होता आणि त्यामुळेच त्याच्या वागण्यात बदल झाला होता.”