साऊथचे सुपरस्टार मोहनलाल आणि जीतू जोसेफ यांनी २०१३ मध्ये सर्वोत्तम क्राईम थ्रिलर चित्रपट ‘दृश्यम’ आणला होता. त्या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर हा चित्रपट बॉलिवूडमध्ये तयार झाला आणि त्यात अभिनेता अजय देवगणने प्रमुख भूमिका साकारली. या चित्रपटाचे दोन्ही भाग तुफान हिट झाले. आता या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाबद्दल एक मोठी माहिती समोर आली आहे.

‘दृश्यम’ आणि ‘दृश्यम २’ या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांच्या चांगलीच पसंती मिळाली. या चित्रपटाच्या कथेने प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवलं. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर भरपूर गल्ला जमवला. वृत्तानुसार, या आगामी चित्रपटाची तयारी सुरू आहे. दाक्षिणात्य ‘दृश्यम’च्या निर्मात्यांनी तिसर्‍या भागासाठी हिंदी चित्रपटाच्या निर्मात्यांशी करार केला आहे.

आणखी वाचा : ‘दृश्यम २’साठी अजय देवगणने आकारलं ‘इतके’ कोटी मानधन; आकडा वाचून व्हाल थक्क

दिग्दर्शक अभिषेक पाठक आणि या चित्रपटाच्या लेखक टीमने ‘दृष्यम ३’साठी कथेतील ट्विस्ट्स तयार केले आहेत. ‘दृश्यम’ची हिंदी आणि मल्याळम टीम एकाच वेळी दोन्ही चित्रपटांचं शूटिंग करण्यासाठी आणि एकाच तारखेला संपूर्ण भारतात प्रदर्शित करण्यासाठी एकत्र काम करत आहे. त्यामुळे आता अभिनेते मोहनलाल पुन्हा मल्याळममधील गोर्ज कुट्टीच्या भूमिकेत दिसणार आहे. तर दुसरीकडे, अजय देवगण त्याच्या हिंदी भाषेतील ‘दृश्यम’मध्ये विजय साळगावकरच्या भूमिकेत दिसणार आहे.

हेही वाचा : “त्याने आम्हाला…”, निशिकांत कामतच्या आठवणीत अजय देवगण आणि तब्बू भावूक

याचबरोबर एकदा दोन्ही चित्रपटांची पटकथा फायनल झाल्यानंतर, तेलुगू, हिंदी आणि मल्याळम दृश्यमचे निर्माते तिन्ही चित्रपटांच्या प्रदर्शनाची एक तारीख ठरवून एकाच तारखेला हा चित्रपट प्रदर्शित करतील. हा चित्रपट २०२४ च्या अखेरीस प्रदर्शित होईल असा अंदाज वर्तवला जात आहे.