This Bollywood Actor To Perform Ravan Dahan At Delhi’s Red Fort : सध्या नवरात्रीनिमित्त सर्वत्र आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. अनेक कलाकार मंडळीदेखील देवीचं दर्शन घेत असल्याचं सोशल मीडियावरील फोटो व व्हिडीओंमधून पाहायला मिळतं. अशातच आता नवरात्रीच्या शेवटी दसऱ्याला बॉलीवूड अभिनेता बॉबी देओल दिल्लीतील रामलीला या कार्यक्रमात सहभागी होणार आहे.

बॉबी देओल सध्या आर्यन खानच्या ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’मुळे चर्चेत आहे. यामध्ये तो महत्त्वपूर्ण भूमिकेतून पाहायला मिळतोय. अशातच आता अभिनेता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, त्याचं कारण म्हणजे दिल्लीतील लाल किल्ल्यावरील रामलीला या प्रसिद्ध कार्यक्रमामुळे. अभिनेत्याला या कार्यक्रमाचं आमंत्रण मिळालं असून तो यंदा दसऱ्याच्या दिवशी त्या कार्यक्रमात रावण दहन करणार आहे.

दसऱ्यानिमित्त बॉबी देओलला खास आमंत्रण

‘हिंदुस्तान टाईम्स’च्या वृत्तानुसार लव कूश रामलीला कमिटीकडून बॉबी देओलला दसऱ्यासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. बॉबी देओलने हे निमंत्रण स्वीकारलं असून येत्या २ ऑक्टोबर रोजी या कार्यक्रमात बॉबी देओल रावण दहन करणार आहे. दिल्लीतील लाल किल्ल्यावर हा कार्यक्रम पार पडणार आहे. कमिटीच्या टीमकडून सोशल मीडियावर यासंबंधित व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये बॉबी देओलने तो या कार्यक्रमासठी उत्सुक असल्याचं म्हटलं आहे. तो म्हणाला, “दिल्लीतील रामलीलामध्ये यावर्षी मी येत आहे, तर भेटूयात दसऱ्याच्या दिवशी” असं त्याने म्हटलं आहे.

लाल किल्यावरील लव कुश कमिटी नामांकित आयोजकांपैकी एक आहे. दरवर्षी या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. लाखो लोक इथे हा कार्यक्रम पाहण्यासाठी येत असतात. गेल्यावर्षी इथे ‘सिंघम अगेन’ चित्रपटाच्या टीमने हजेरी लावलेली. दिग्दर्शक रोहित शेट्टीबरोबर चित्रपटातील कलाकार मंडळी दसरा साजरा करण्यासाठी दिल्लीत गेले होते.

दरम्यान, बॉबी देओल अलीकडेच चर्चेत आला ते संदीप रेड्डी वांगाच्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटातून. यानंतर आता तो शाहरुख खानच्या मुलाच्या ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’ या वेब सीरिजमधून झळकत आहे. यानिमित्त दिलेल्या मुलाखतीत त्याने आर्यन खानचं खूप कौतुकही केलं.