Emraan Hashmi Son: बॉलीवूड अभिनेता इमरान हाश्मी आणि अभिनेत्री यामी गौतम यांचा आगामी ‘हक’ चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. ‘हक’ चित्रपट शाहबानो प्रकरणावर आधारित असल्याचं म्हटलं जात आहे. शाहबानो हा खटला मोहम्मद अहमद खान विरुद्ध शाहबानो यांच्यातील पोटगीसाठीचा होता. याच खटल्यावर ‘हक’ हा चित्रपट तयार करण्यात आला असल्याचं म्हटलं जात आहे.

‘हक’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर अनेकांनी चित्रपटाचं कौतुक केलं आहे, तर काहींनी टीकाही केली आहे. टीकाकारांचं म्हणणं आहे की, हा चित्रपट मुस्लीम समुदायाबद्दल चुकीचं चित्रण करीत आहे. मात्र, एका मुलाखतीत इमरान हाश्मीने चित्रपटाच्या टीकेवर “हा चित्रपट कोणत्याही समुदायाला उद्देशून नाही” असं म्हटलं आहे.

ANI शी बोलताना इमरान म्हणाला, “मी या चित्रपटाची पटकथा वाचली आणि एका कलाकाराच्या दृष्टिकोनातून याकडे पाहिलं. पण, माझ्या करिअरमध्ये पहिल्यांदाच मला लक्षात यायला लागलं की एका समुदायाशी, विशेषतः माझ्या समुदायाशी संबंधित संवेदनशीलता लक्षात ठेवणे किती महत्त्वाचे आहे. मला सावध राहावं लागलं आणि वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागला. या चित्रपटातून मला असं जाणवलं की, चित्रपटाचा उद्देश खूप संतुलित आहे. आम्ही कोणत्याही समुदायावर बोट दाखवत नाही किंवा त्याबद्दल न्याय करत नाही.”

इमराननं पुढे सांगितलं की, “हा चित्रपट कुठल्याही समुदायावर टीका करत नाही किंवा कुठल्याच समाजाला लक्ष्य करत नाही. लोक काय म्हणतील हे मला माहीत नाही, पण एक उदारमतवादी मुस्लीम म्हणून मी सांगू शकतो की, या चित्रपटातून आम्ही कुठल्याही समुदायावर टीका करत नाही, जर केली असती तर मी हा चित्रपट केलाच नसता.”

इम्रान हाश्मी इन्स्टाग्राम पोस्ट

यापुढे त्यानं सांगितलं, “मी परवीनशी विवाह केला आहे, जी हिंदू आहे. माझ्या कुटुंबात माझा मुलगा पूजा करतो, तसेच नमाजही पठण करतो. हीच माझी धर्मनिरपेक्ष संस्कृती आहे, त्यामुळे माझ्या दृष्टिकोनातून मी हा चित्रपट पाहतो. प्रत्येकजण त्याच्या धार्मिक श्रद्धा, संस्कारानुसार चित्रपट पाहतो.”

‘हक’ या चित्रपटाबद्दल सांगायचं झाल्यास, ‘हक’चे दिग्दर्शन सुपर्ण एस वर्मा यांनी केले आहे. चित्रपटात वर्तिका सिंग, दानिश हुसेन, शीबा चड्ढा, असीम हत्तांगडी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. चित्रपटाचे निर्माते विनीत जैन, विशाल गुर्नानी, जुही पारेख मेहता आणि हरमन बवेजा आहेत. हा चित्रपट येत्या ७ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.