Esha Deol And Bharat Takhtani: ‘कोई मेरे दिल से पूछे’ या चित्रपटातून अभिनेत्री ईशा देओलने पदार्पण केले. त्यानंतर ‘ना तुम जानो ना हम’, ‘धूम’, ‘चुरा लिया है हमने’, ‘मैं ऐसा ही हूँ’, ‘दस’, ‘आँखे’, ‘वन टू थ्री’ अशा चित्रपटांतून तिने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. ईशा देओल ही हेमा मालिनी व धर्मेंद्र यांची मुलगी आहे. काही दिवसांपासून ती तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी तिचा एक्स पती भरत तख्तानीने गर्लफ्रेंडबाबत खुलासा केला. त्यानंतर ईशा देओलदेखील चर्चेत आली.

ईशा व भरत यांनी २०१२ मध्ये लग्नगाठ बांधली होती; मात्र ११ वर्षांच्या संसारानंतर त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. २०२४ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. त्यांना राध्या व मिराया या दोन मुली आहेत. त्यांचे दोघांनी मिळून संगोपन करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

ईशा देओल काय म्हणाली?

घटस्फोटाआधी हे जोडपे अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांबरोबरचे फोटो शेअर करताना दिसत होते. पण, तुम्हाला माहीत आहे का, जेव्हा ईशाने भरत तख्तानीशी लग्न केले, तेव्हा तिला अनेक नवीन गोष्टी समजल्या. तिला काही सामाजिक नियमांचे पालन करावे लागले. घरात तिला शॉर्ट कपडे घालण्यास परवानगी नव्हती, असा खुलासा तिने केला.

ईशा देओलने २०२० मध्ये अम्मा मिया (Amma Mia) हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात तिने भरतशी लग्न करून ती जेव्हा तख्तानी कुटुंबात गेली, त्यावेळी तिच्या आयुष्यात कोणत्या गोष्टी बदलल्या, याबाबत तिने लिहिले आहे. तिने लिहिले, “आमचे २०१२ मध्ये लग्न झाले. त्यानंतर खूप गोष्टी बदलल्या. जेव्हा मी त्याच्या कुटुंबाबरोबर राहू लागले, तेव्हा आधी जसे मी शॉर्ट कपड्यांमध्ये राहत असे, तसे कपडे मी घालू शकत नसे. तख्तानी कुटुंबातील स्त्रिया त्यांच्या पतीसाठी जेवण बनवून, त्यांना डबा देत असत. मी माझ्या आधीच्या आयुष्यात कधीच जेवण बनवले नव्हते.”

पुढे तिने तिच्या सासूचे कौतुक करीत लिहिले, “माझ्या सासूने मला कधीच मी स्वयंपाक करावा, असा आग्रह केला नाही. तसेच, सून म्हणून काही गोष्टी कराव्यात, अशा अपेक्षाही त्यांनी केल्या नाहीत. त्यांनी मला त्यांच्या कुटुंबात स्वीकारले. मी कुटुंबातील पहिली सून होते. त्यामुळे माझे खूप लाड झाले. माझ्या सासूने माझे खूप लाड केले. माझ्या सासूसाठी मी त्यांचा तिसरा मुलगा होते. घरातील इतर सदस्यही माझ्यासाठी खूप गोष्टी करत असत. ते कधी माझ्यासाठी फळे, कधी चॉकलेट ब्राऊनीज, तर कधी इतर गोष्टी पाठवत असत.”

घटस्फोटानंतर ती एकटी मुलांचा सांभाळ करीत असल्याबद्दल तिला एका मुलाखतीत प्रश्न विचारला गेला होता. त्यावर अभिनेत्री म्हणाली होती की, मला सिंगल मदर म्हणून घ्यायला आवडत नाही. इतर कोणी मला तशी वागणूक द्यावी, असेही मला वाटत नाही.

दरम्यान, ईशा देओल अनेकदा आई हेमा मालिनीबरोबर सार्वजनिक ठिकाणी दिसते. सोशल मीडियावरदेखील अभिनेत्री सक्रिय असते.