Esha Gupta Reacts on Fight With Sajid Khan : अभिनेत्री नवीना बोलेनं नुकत्याच एका मुलाखतीत दिग्दर्शक साजिद खानवर धक्कादायक आरोप केले. साजिदने ऑडिशनच्या बहाण्याने बोलावून कपडे काढण्यास सांगितल्याचा आरोप नवीनाने केला होता. सुभोजित घोषच्या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत ती या कास्टिंग काऊचच्या घटनेविषयी व्यक्त झाली होती. अशातच आता आणखी एका अभिनेत्रीनेही साजिदने तिला शिवी दिल्याचं सांगितलं आहे. ‘हमशकल्स’ या चित्रपटादरम्यान दोघांमध्ये भांडण झालं होतं. त्यावेळी साजिदने तिला शिवी दिली होती.

अभिनेत्री ईशा गुप्ताने साजिद खानच्या ‘हमशकल्स’ चित्रपटात काम केले होते. या चित्रपटादरम्यान, ईशा आणि साजिद यांच्यात वाद झाला आणि या वादात त्याने शिवी दिल्याचं तिने सांगितलं आहे. या वादानंतर ईशाने हा चित्रपट करण्यास नकारही दिला होता; पण नंतर निर्माते आणि साजिदने तिची माफी मागितली. त्यामुळे मग तिने या चित्रपटात काम केलं. सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत ईशाने याबद्दल सविस्तर सांगितलं.

यावेळी ईशा असं म्हणाली, “‘हमशकल्स’ चित्रपटाच्यावेळी सेटवर कुणाचंच एकमेकांशी पटत नव्हतं. तेव्हा सेटवर वातावरण खूपच वाईट होतं. त्यावेळी माझं दिग्दर्शक साजिद खानबरोबर भांडण झालं होतं. त्याने मला शिवी दिली होती, तर मीसुद्धा त्याला शिवी दिली. त्याच्याबरोबरच्या भांडणानंतर मी गाडीत बसले आणि थेट घरी निघून आले. मी तिथे एक क्षणही थांबली नाही. मी चित्रपट जवळपास सोडूनच दिला होता; पण निर्मात्यांनी माफी मागितली. नंतर साजिदनेही फोन करून माफी मागितली.”

ईशा गुप्ता इन्स्टाग्राम पोस्ट

यापुढे ईशा म्हणाली, “मला माझ्याशी कोणी नीट वागलं नाही, तर मला ते आवडत नाही. काही लोक बोलण्यापूर्वी विचार करत नाहीत. आयुष्यात अनेक लोक निराश असतात. पण आता मी त्याबद्दल काही बोलू इच्छित नाही, कारण मी त्या सर्व गोष्टी सोडून पुढे आली आहे. मला असं वाटतं की, आपण चांगल्या मनाने एखादं काम केलं; तर त्याबाबतीत सगळं चांगलंच होतं. चित्रपटाने कमाई चांगली केली नसेल किंवा समीक्षकांनी चित्रपटाबद्दल वाईट परीक्षण केलं असेल, तरीही त्या चित्रपटाबाबत काहीना काही चांगलं होतंच.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

MeToo बद्दल ईशा गुप्ताचं वक्तव्य

यानंतर ईशाने तिच्याबरोबर कधीही MeToo ची घटना घडली नसल्याचे सांगितलं. याबद्दल ती म्हणाली, “MeToo बद्दल जेव्हा साजिदवर आरोप होऊ लागले होते. तेव्हा त्या आरोप करणाऱ्यांमध्ये माझं नावही घेण्यात आलं होतं. पण माझ्याबरोबर त्याने तसं काहीही केलं नाही. जे खरं आहे ते आहे. कारण जसं त्याने मला शिवी दिल्याचं मी खुलेपणाने सांगितलं. तसंच मी हेसुद्धा सांगू शकले असते. पण तसं काहीच झालं नाही. म्हणूनच मी त्याच्याबद्दल असं काहीही बोलणार नाही.”