बॉलिवूड गाण्यांमधून लोकप्रियता मिळवणाऱ्या आतिफ अस्लमचे केवळ भारतातच नव्हे तर जगभरात चाहते आहेत. जी मंडळी संगीतावर निस्सीम प्रेम करतात त्यांचा तर आतिफ अस्लम हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. मध्यंतरी पाकिस्तानी कलाकारांवर आलेल्या बंदीमुळे तिथल्या गायकांवर तसेच कलाकारांवर बरीच बंधनं आली, तरी कोक स्टुडिओ आणि इतर काही लाईव्ह प्रोग्रामच्या माध्यमातून आतिफ त्याच्या चाहत्यांचं मनोरंजन करत असतो.

आतिफच्या अशाच एका लाईव्ह शोमधला एक व्हिडीओ चांगलाच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक विचित्र प्रकार लाईव्ह शोदरम्यान घडल्याने आतिफने तातडीने तो कार्यक्रम बंद केल्याचं स्पष्ट झालं आहे. या व्हिडीओमध्ये आतिफ लाईव्ह परफॉर्म करत असताना त्याच्या चाहत्याने त्याच्यावर पैसे उधळल्याने आतिफने शो तिथल्या तिथेच थांबवला.

आणखी वाचा : सनी देओल लावणार ‘कॉफी विथ करण’च्या नव्या पर्वात हजेरी; कधी पाहायला मिळणार नवा एपिसोड? वाचा

अमेरिकेत एका लाईव्ह शोदरम्यान गाणं गाताना अचानक आतिफवर नोटांचा वर्षाव होऊ लागला ज्यामुळे तो चांगलाच अस्वस्थ झाला. त्याने तो कार्यक्रम लगेच तिथे थांबवला आणि अत्यंत शांत, विनम्र स्वरात चाहत्याला विनंतीही केली. आतिफ त्या चाहत्याला म्हणाला, “मित्रा हे पैसे माझ्यावर उधळण्यापेक्षा दान कर.” इतकंच नव्हे तर आतिफने त्या चाहत्याला मंचावर येऊन ते पैसे परत घेऊन जाण्याससुद्धा विनंती केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे आतिफ म्हणाला, “तुम्ही खूप श्रीमंत आहात अन् मीदेखील त्याचा आदर करतो, पण अशापद्धतीने पैसे उधळणे म्हणजे हा त्या पैशांचा अनादर आहे.” आतिफ अस्लमची ही कृती चाहत्यांना फार आवडली अन् सोशल मीडियावर सर्वत्र हा व्हिडीओ व्हायरल होत असून आतिफच्या विनम्रतेची प्रशंसा होत आहे. त्याच्या चाहत्यांनी तर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. त्याने ही गोष्ट फार समजूतदारपणे हाताळली असं त्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर म्हंटलं आहे. खुद्द आतिफनेही नुकतंच पॅलेस्टाईनमधील लोकांसाठी १५ लाख रुपयांची मदत केली होती.