Fandry Fame Actor Shares His Experience of Working With Amitabh Bachchan : गेली दोन दशकं आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे महानायक म्हणजे अमिताभ बच्चन. आजवर अनेक सिनेमांमधून त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंज केलं आहे. त्यांचे प्रत्येक सिनेमे आणि त्यातील भूमिका प्रेक्षकांच्या आजही आठवणीत आहेत

मनोरंजन विश्वातील अनेक नवख्या कलाकारांसाठी अमिताभ बच्चन हे अभिनयाचं जणू एक विद्यापीठच आहे. त्यांच्याबरोबर अनेक कलाकारांची काम करण्याची इच्छा असते आणि काही कलाकारांची ती इच्छा पूर्णही झाली आहे. अमिताभ यांच्याबरोबर काम केलेल्या काही नवख्या कलाकारांमध्ये ‘फँड्री’ फेम जब्या अर्थात सोमनाथ अवघडेचंही नाव आहे.

‘झुंड’ या हिंदी सिनेमात सोमनाथने अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम केलं असून हा अनुभव त्याच्यासाठी कसा होता, याबद्दल सोमनाथने नुकत्याच एका मुलाखतीत सांगितलं आहे. ‘फँड्री’चे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी ‘झुंड’चं दिग्दर्शन केलं आहे.

NB Podcast ला दिलेल्या मुलाखतीत सोमनाथला त्याची आव्हानात्मक भूमिका विचारली. तेव्हा सोमनाथ म्हणाला, “‘झुंड’मध्ये मी अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम केलं आहे. तर त्या चित्रपटातली माझी भूमिका मला आव्हानात्मक वाटली होती. कारण त्यात हिंदी भाषा होती आणि अमिताभ बच्चन सर यांच्याबरोबर काम करायचं होतं. ते वन-टेक मध्ये सीन करतात असं ऐकून होतो; त्यामुळे इतक्या मोठ्या कलाकाराबरोबर काम करताना दडपण आलं होतं.”

यांनंतर तो म्हणाला, “मी स्वत:ला नशीबवान समजतो की, मला पहिल्याच सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि लगेच दुसऱ्या सिनेमात मला अमिताभ सरांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. अनेक कलाकारांनी त्यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा असते. काहींना तर ती संधी अजून मिळालीही नाही. पण मला त्यांच्याबरोबर काम करण्याचं भाग्य मिळालं.”

यापुढे सोमनाथ म्हणाला, “‘झुंड’मध्ये त्यांचे आणि माझे बरेच एकत्र सीन होते. त्यामुळे आपल्याकडून काही चुका होऊ नयेत असं वाटत असे. बच्चन सरांचा स्वभाव खूपच छान आहे. त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं. मी प्रत्येक टेकनंतर त्यांना काम चांगलं होतंय का? असं विचारायचो. त्यावर तेसुद्धा होहो… खूप छान करत आहेस असं उत्तर द्यायचे.”

यानंतर सोमनाथ म्हणतो, “‘झुंड’च्या सेटवर बच्चन सर आमच्याबरोबर डान्स करायचे. गप्पा मारायचे. ते त्यांच्या कामाबद्दल आम्हाला माहिती द्यायचे. आज टीव्हीवर ‘झुंड’ सिनेमा लागला की, माझे आई-वडील बघतात, तर त्यांनाही आनंद वाटतो.”