Farah Khan Talks About Her Struggling Days : फराह खान बॉलीवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शिका आहे. सध्या ती तिच्या यूट्यूब चॅनेलवरील ब्लॉगमुळे खूप चर्चेत असते. फराह खानने स्वबळावर इंडस्ट्रीत स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. अशातच आता तिने तिच्या संघर्षकाळाबद्दल सांगितलं आहे.

फराह खानने तिच्या वडिलांच्या निधनाबद्दल आणि त्यांच्या आयुष्यात निर्माण झालेल्या आर्थिक अडचणींबद्दल सांगितलं आहे. तिचे वडील कमरन खान एकेकाळी यशस्वी निर्माते होते. परंतु, त्यांनाही काही खडतर आव्हानांचा सामना करावा लागला होता; तर त्यांच्या निधनानंतर फराहलाच वयाच्या १५व्या वर्षी काम करावं लागलं आणि खांद्यावर पडलेली जबाबदारी पार पाडावी लागली.

फराह खानने सांगितला संघर्षकाळ

‘दी इंडियन एक्स्प्रेस’च्य वृत्तानुसार फराहने सानिया मिर्झाबरोबर ब्लॉगमार्फत संवाद साधत असताना तिच्या संघर्षकाळाबद्दल सांगितलं आहे. सानियाने फराहला आर्थिक अडचणी आणि तिच्या वडिलांच्या दारूच्या व्यसनाबद्दल विचारल्यानंतर ती म्हणाली, “खूप अचानक सगळं घडत गेलं; आमचा एक संपूर्ण मजला होता आणि हळूहळू आम्हाला त्यावरील एक एक फ्लॅट विकावा लागला. शेवटी आम्ही एक हॉल आणि एक रूम अशा घरात रहात होतो, जे आम्ही विकू शकत नव्हतो कारण ते माझ्या आईच्या नावावर होतं. तेव्हा त्या हॉलमध्ये लोक यायचे आणि पत्ते खेळत बसायचे.”

फराह पुढे म्हणाली, “पत्ते खेळायला आलेले लोक प्रत्येकी पाच पाच रुपये आमच्यासाठी ठेवायचे, जे एकूण ३०-३५ रुपये व्हायचे आणि त्यापासून आम्ही दूध, भाजी वगैरे गोष्टी खरेदी करायचो आणि जर ते कधी पत्ते खेळायला आले नाही तर घरात काहीच खायला प्यायला नसायचं.”

पुढे वडिलांबद्दल फराह म्हणाली, “माझे बाबा व्यसनाच्या अधीन झाले होते. खूप वाईट वेळ होती ती, माझ्या वडिलांना अशा परिस्थितीत पाहणं खूप जड जायचं. घरी सतत दारूचा वास यायचा, त्यामुळे मी कॉलेजमध्येच साडे सहा ते सातपर्यंत असायचे, जेणेकरून मला घरी जावं लागणार नाही. मी जेव्हा कधी प्रवास करते तेव्हा मला या आठवणी आठवतात. आजही मला पैशांबाबत असुरक्षितता जाणवते.”