चित्रपट दिग्दर्शक आणि प्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खान काही दिवसांपूर्वीच गायक शानच्या घरी जाऊन त्याला भेटल्या होत्या. यावेळी फराह खान आणि शान यांनी बऱ्याच गप्पा मारल्या. याच गप्पांदरम्यान फराह खान यांनी जो जिता वही सिकंदर दरम्यानचा एक प्रसंग सांगितला. जो जिता वही सिकंदर हा सिनेमा माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरला असंही फराह खान म्हणाल्या.

काय म्हटलंय फराह खान यांनी?

मी त्या चित्रपटाशी असिस्टंट डायरेक्टर म्हणून जोडले गेले होते. मला काही दिवसांतच कोरिग्राफीही करायला सांगितली. मला एडी म्हणून कामाचे पैसे मिळाले नाहीत तसंच कोरिग्राफीचेही पैसे मिळाले नाहीत. मी त्या चित्रपटात ज्युनिअर डान्सर म्हणूनही काम केलं. दीपक तिजोरीने एका सीनमध्ये माझ्या गालावर किस केलं. जिला किस करायचं होतं तिने नकार दिला होता. त्यामुळे त्या सीनसाठी मला पाठवण्यात आलं. ज्या मुलीला बोलवण्यात आलं होतं तिने सरळ सांगितलं की दीपक तिजोरीने मला किस केलेलं चालणार नाही. त्यामुळे मला कपडे बदलून पाठवण्यात आलं. त्यानंतर मी तिकडे गेले, ज्यानंतर दीपकने मला किस केलं.

शानने जो जिता बाबत काय सांगितलं?

जो जिता वही सिकंदरच्या आठवणी शाननेही सांगितल्या. तो म्हणाला दीवाने हम प्यार के या गाण्याची आठवण मला आहे. मला चार दिवस काम केल्याचे प्रति दिवस १५० रुपये मिळाले होते. तर बाकीच्यांना प्रति दिवस ७५ रुपये मिळाले होते. त्यावर फराह खान चटकन म्हणाली की तुला पैसे मिळाले होते? मला त्या चित्रपटातील कामाचे काहीच पैसे मिळाले नाहीत. मात्र त्या चित्रपटाने माझ्यासाठी जे केलं ते कुठल्याही पैशांपेक्षा जास्तच ठरलं. चित्रपट तर नंतर आला पण शुटिंग १९९० मध्येच सुरु होतं. मी तेव्हा त्या ठिकाणी फिरताना एका शॉटमध्ये दिसतो आहे असंही शानने सांगितलं.

जो जिता वही सिकंदर हा चित्रपट खूप गाजला

जो जिता वही सिकंदर हा चित्रपट आमिर खान, आयेशा जुल्का, पूजा बेदी, दीपक तिजोरी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. कॉलेजच्या स्पर्धांवर हा चित्रपट होता. हा चित्रपट आणि त्यातली गाणी त्या पिढीला खूप आवडली होती. खासकरुन पहला नशा पहला खुमार हे गाणं पुढची कैक वर्षे नव्याने प्रेमात पडणाऱ्या जोडप्यांचं गाणं होतं. या चित्रपटातली आमिर खानची भूमिका, दीपक तिजोरीची भूमिका सगळंच लोकांच्या लक्षात आहे. तसंच या सिनेमातली सायकल रेसही चर्चेचा विषय ठरली होती.