Farhan Akhtar on Sridevi: फरहान अख्तर हा फक्त अभिनयासाठीच नाही, तर त्याने निर्मिती केलेल्या चित्रपटांसाठीदेखील ओळखला जातो. १९९१ मध्ये अभिनेत्याने १७ व्या वर्षी त्याच्या करिअरला सुरुवात केली होती.
यश चोप्रा यांच्या लम्हें या चित्रपटात त्याने सहायक सिनेमॅटोग्राफर म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. मात्र, या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एक अशी घटना घडली, ज्यामुळे १७ वर्षांच्या फरहानला वाटले की, त्याचे करिअर सुरू होण्याआधीच संपले.
फरहानने नुकतीच आपकी अदालत या शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी त्याने ३५ वर्षांपूर्वी घडलेली घटना सांगितली. तो म्हणाला, “यश चोप्रा यांनी सेट लावला होता. सरोजजी गाण्याची कोरिओग्राफी करीत होत्या. श्रीदेवींना त्या गाण्यातून राग आणि दु:ख या दोन्ही भावना दाखवायच्या होत्या. तो शेवटचा सीन होता, क्रेन शॉट होता.”
“ओरडण्याऐवजी त्या…”
“श्रीदेवी सराव करीत होत्या. सिनेमॅटोग्राफर मनमोहन सिंग फ्रेम तपासत होते. त्यांना तिथे एक डाग दिसला. त्यांनी कोणाला तरी तो डाग साफ करायला सांगितले. मी तिथे जवळच होतो.त्या मुळे मी पळत गेलो आणि तो डाग पुसला.”
फरहानने पुढे सांगितले, “या गडबडीत श्रीदेवी त्यांच्याकडे येत असल्याचे मनमोहन सिंग यांच्या लक्षात आले नाही. मी खाली वाकून तो डाग पुसत होतो. तितक्यात श्रीदेवी तिथे आल्या, त्यांचा पाय घसरला आणि त्या पडल्या. मला हे स्लोमोशनमध्ये आठवते. त्या आधी हवेत उडाल्या आणि त्यानंतर जमिनीवर आपटल्या. संपूर्ण सेट स्तब्ध झाला होता. त्यावेळी माझ्या डोक्यात विचार चालू होता की, माझे करिअर संपले.”
अभिनेत्याने पुढे सांगितले, “श्रीदेवींना राग आला नाही. ओरडण्याऐवजी त्या हसल्या आणि म्हणाल्या की, अशा गोष्टी घडत असतात. त्या हसल्यानंतर सर्व जण हसू लागले. त्यानंतर मी मोठा श्वास घेतला.”
लम्हें या चित्रपटानंतर फरहानने जाहिरात जगतात काम केले. त्यानंतर १० वर्षांनी त्याने दिग्दर्शनात पदार्पण केले. दिल चाहता है या चित्रपटातून त्याने पदार्पण केले होते. हा चित्रपट खूप मोठ्या प्रमाणात गाजला. आजही या चित्रपटाचे मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. मनोरंजनसृष्टीतील त्याच्या करिअरबद्दल बोलताना त्याने श्रीदेवींबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तो म्हणाला की, मला मनापासून वाटते की, माझ्या करिअरचे श्रेय श्रीदेवींना आहे.
