बिग बजेट आणि तगडी स्टारकास्ट असलेला बहुचर्चित ‘आदिपुरुष’ चित्रपट आज १६ जून रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. व्हीएफएक्स व इतर वादांमुळे दोनदा टीझर व ट्रेलरमध्ये बदल करण्यात आले. शिवाय चित्रपटाचं प्रदर्शनही पुढे ढकलण्यात आलं होतं. त्यानंतर अखेरीस आज चित्रपट प्रदर्शित झाला, मात्र तरीही प्रेक्षकांची निराशा झाल्याचं दिसतंय. इतकंच नव्हे तर चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी हा चित्रपट निराशाजनक असल्याचं म्हटलं आहे.
हेही वाचा – “रावण अली खिलजी, प्रभू येशू, उर्फी जावेद अन्…”, ‘आदिपुरुष’ पाहून नेटकरी संतापले; म्हणाले, “ओम राऊत तू…”
“आदिपुरुष हा एक निराशाजनक चित्रपट आहे. तो आपल्या कोणत्याही अपेक्षा पूर्ण करत नाही. दिग्दर्शक ओम राऊतकडे एक स्वप्नवत स्टारकास्ट (दिग्गज कलाकारांची फौज) आणि प्रचंड मोठं बजेट होतं, पण त्याचा वापर करून त्याने फक्त गोंधळ निर्माण केला आहे,” असं ट्वीट तरण आदर्श यांनी केलंय. त्यांनी चित्रपटाला फक्त अर्धा स्टार रेटिंग दिलंय.
तरण आदर्श यांच्या ट्वीटवर अनेक युजर कमेंट्स करत आहेत. ‘बरं झालं तिकिट काढलं नाही, पैसे वाचले,’ ‘आदिपुरुष पाहिल्यानंतर गरुड पुराणात एक शिक्षा आणखी वाढली असेल,’ अशा कमेंट्स नेटकरी त्यावर करत आहेत. दरम्यान, या चित्रपटात प्रभास, क्रिती सेनॉन, सैफ अली खान व देवदत्त नागे यांच्या प्रमुख भुमिका आहेत. चित्रपटाचं दिग्दर्शन ओम राऊतने केलं आहे.