सध्या सर्वत्र शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाची चर्चा आहे. या चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसतोय. या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या आधीपासूनच या चित्रपटाने नवे विक्रम नोंदवायला सुरुवात केली होती. तर आतापर्यंत या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड्स मोडले आहेत. फक्त पाच दिवसांत या चित्रपटाने भारतातून २८२ कोटी तर जगभरातून ५०० कोटींहून अधिक गल्ला जमवला आहे. परंतु ‘पठाण’ बरोबर प्रदर्शित झालेल्या राजकुमार संतोषी दिग्दर्शित ‘गांधी-गोडसे: एक युद्ध’ या चित्रपटाची मात्र अगदी विरुद्ध परिस्थिती झाली आहे.
‘पठाण’च्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे २६ जानेवारी रोजी ‘गांधी-गोडसे: एक युद्ध’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात नथुराम गोडसे आणि महात्मा गांधी यांच्या विचारसरणीमधील भिन्नता दाखवण्यात आली आहे. राजकुमार संतोषी दिग्दर्शित या चित्रपटाला मात्र थंड प्रतिसाद मिळताना दिसतोय.
‘गांधी-गोडसे: एक युद्ध’ चित्रपटाच्या टीझर आणि ट्रेलरला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. तेव्हा हा चित्रपट पाहण्यासाठी अनेकांनी उत्सुकता दर्शवली होती. मात्र हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर हा चित्रपट बघणाऱ्यांची संख्या कमी असल्याचं दिसत आहे. रिपोर्टनुसार, पहिल्या दिवशी या चित्रपटाने भारतात केवळ ८० लाखांची कमाई केली. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाच्या कमाईचा आकडा बराच खाली आला. दुसऱ्या दिवशी चित्रपटाने ३४ लाख कमावले. तर काल प्रदर्शनाच्या पाचव्या दिवशी या चित्रपटाने १६ लाखांचा गल्ला जमवला. या चित्रपटाचं बजेट ४५ कोटी होतं. पण आतापर्यंत हा चित्रपट ३ कोटींचीही कमाई करू शकला नाहीये.
हेही वाचा : ‘पठाण’ नाही तर जान्हवी कपूरने पाहिला ‘गांधी-गोडसे: एक युध्द’, कारण…
‘गांधी-गोडसे: एक युद्ध’ आणि ‘पठाण’ या चित्रपटात सध्या स्पर्धा पाहायला मिळत आहे. ‘गांधी-गोडसे: एक युद्ध’ या चित्रपटात चिन्मय मांडलेकर नथुराम गोडसेची भूमिका साकारली आहे. नथुराम गोडसे महात्मा गांधींवर गोळ्या झाडतो पण गांधी त्यातून वाचतात आणि नंतर महात्मा गांधी नथुरामला भेटून त्यांच्यात वैचारिक युद्ध रंगतं असं या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे.