Genelia & Riteish Deshmukh : जून महिन्याचा तिसरा रविवार दरवर्षी ‘फादर्स डे’ म्हणून साजरा केला जातो. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आई एवढंच आपल्या वडिलांना देखील महत्त्व असतं. बॉलीवूडसह मराठी कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी आज ‘फादर्स डे’ निमित्त आपल्या वडिलांना शुभेच्छा देणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत.
लोकप्रिय अभिनेत्री जिनिलीया देशमुखने ‘फादर्स डे’ रितेशसाठी खास पोस्ट शेअर करत त्याचं कौतुक केलं आहे. रितेशने २०१२ मध्ये अभिनेत्री जिनिलीया देशमुखशी लग्नगाठ बांधली. या जोडप्याला रियान आणि राहील अशी दोन मुलं आहेत. रितेश-जिनिलीयाची मुलं शालेय अभ्याक्रमाबरोबरच स्पोर्ट्समध्येही सक्रिय आहेत. त्यामुळे मुलांच्या फुटबॉल मॅचेच पाहण्यासाठी हे दोघंही आवर्जून जातात आणि रियान-राहीलला चिअर करतात. आज ‘फादर्स डे’ निमित्त जिनिलीयाने खास पोस्ट शेअर करत रितेशला शुभेच्छा दिल्या आहेत.
अभिनेत्री लिहिते, “प्रिय रितेश, तू तुझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट उत्तम करतोस. तुझं काम असूदे किंवा बाबा म्हणून आपल्या मुलांची जबाबदारी घेणं… सगळ्या गोष्टीत तू परफेक्ट आहेस. विशेषत: मी म्हणेन… चांगला बाबा होण्याचे सगळेच रेकॉर्ड्स तू मोडले आहेत. नि:स्वार्थपणा, मुलांवर प्रचंड प्रेम करणारा, त्यांच्याशी मस्ती करणारा रियान अन् राहीलचा पर्सनल सुपरहिरो आहेस तू….! द बेस्ट बाबा एव्हर!”
पत्नी जिनिलीयाने शेअर केलेली हीच इन्स्टाग्राम स्टोरी रिशेअर करत रितेश म्हणतो, “थँक्यू बायको तुझ्यामुळे मी आपल्या मुलांचा चांगला बाबा बनू शकलो”

दरम्यान, रितेश-जिनिलीयाकडे मनोरंजन विश्वातील आदर्श जोडपं म्हणून पाहिलं जातं. त्यांच्या मुलांच्या संस्कारांचं देखील नेटकरी कायम कौतुक करत असतात. या दोघांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ सिनेमा पुढच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची निर्मिती जिनिलीया देशमुख व ज्योती देशपांडे करणार आहेत.
तसेच संजय दत्त, अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते अशा दिग्गज कलाकारांची मांदियाळी या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पुढच्या वर्षी १ मे २०२६ रोजी हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.