Hema Malini Talks About Sunny Deol & Bobby Deol : हेमा मालिनी बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्यांच्या व धर्मेंद्र यांच्या प्रेमकहाणीबद्दल ९०च्या काळात खूप चर्चा झालेली. या जोडीने २ मे १९८० मध्ये लग्न केलं. धर्मेंद्र यांचं हे दुसरं लग्न होतं, त्यामुळे धर्मेंद्र यांची मुलं सनी देओल व बॉबी देओल हेमा यांच्याबरोबर फार बोलत नाहीत अशा चर्चा असतात. पण, हेमा मालिनी यांनी सनी व बॉबी या त्यांच्या सावत्र मुलांबद्दल एकदा प्रतिक्रिया दिलेली.

धर्मेंद्र यांची दोन लग्न झाली असून त्यांना ६ मुलं आहेत. धर्मेंद्र व त्यांच्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर यांना दोन मुलं व दोन मुली अशी ४ मुलं आहेत, तर हेमा मालिनी व धर्मेंद्र यांना २ मुली आहेत. हेमा मालिनी यांनी सिमी गरेवालला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या सावत्र मुलांबद्दल प्रतिक्रिया दिलेली. त्यांच्याबरोबर त्यावेळी त्यांच्या दोन मुली इशा व अहाना देओलही उपस्थित होत्या आणि इशा देओलनेही तिच्या दोन मोठ्या भावांबद्दल प्रतिक्रिया देत त्यांचं कौतुक केलेलं.

हेमा मालिनी व त्यांच्या मुलींनी दिलेल्या मुलाखतीमधील क्लीप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये इशा देओल तिच्या भावांबद्दल बोलताना दिसतेय. ती यामध्ये “आम्ही लंडनला जातो तेव्हा आम्ही बॉबी दादाबरोबर खूप वेळ घालवतो, आम्ही सनी दादाबरोबरही जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करतो,” असं म्हणालेली.

हेमा मालिनी यांनी केलेलं सनी व बॉबी देओलचं कौतुक

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये हेमा मालिनी यांना सनी देओल व बॉबी देओल हे दोघे एकमेकांपासून स्वभावाने वेगळे आहेत का असं विचारण्यात आलेलं. यावर त्या म्हणालेल्या, “ते दोघे खूप चांगले आहेत. सनी त्याच्या वडिलांसारखा आहे. तो धरमजींसारखाच बोलतो. त्याचा स्वभावही त्यांच्यासारखाच आहे. खूप चांगला आहे. तो आणि बॉबी थोडा वेगळा आहे. तो त्याच्यापेक्षा लहान आहे, म्हणूनही तो वेगळा असावा.”

या व्हिडीओमध्ये सिमी गरेवालने पुढे इशा देओलला तुला चांगल्या भेटवस्तू कोण देतं असं विचारल्यानंतर ती म्हणालेली, “सनी दादा. तो मला खूप चांगले शूज घेऊन येतो. त्याला माहीत आहे, मला खेळायला खूप आवडतं; तर तो वेगवेगळ्या ब्रँडचे शूज माझ्यासाठी घेऊन येतो. मीही त्याला सांगते की मला हे हवं ते हवं वगैरे. माझ्याकडे खूप मोठं कलेक्शन आहे आणि ते सगळं त्यानेच दिलेलं आहे.”