ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेत्री हिमानी शिवपुरी यांनी ऐश्वर्या राय आणि सलमान खान यांच्या नात्याबद्दल काही आठवणी शेअर केल्या आहेत. सलमान ऐश्वर्याला तिच्या चित्रपटाच्या सेटवर रात्री उशिरा भेटायला यायचा, तसेच त्यांच्यातील वाद याबद्दल हिमानी यांनी सांगितलं. त्यांनी ऐश्वर्याच्या व्यक्तिमत्त्वाचे कौतुक केले.
हिमानी शिवपुरी यांनी पहिल्यांदा ऐश्वर्याबरोबर ‘आ अब लौट चलें’ मध्ये काम केलं होतं, त्यानंतर ‘हमारा दिल आपके पास है’ आणि ‘उमराव जान’ मध्ये स्क्रीन शेअर केली होती. ‘हमारा दिल आपके पास है’ च्या शूटिंगच्या दिवसांच्या आठवणी त्यांनी रेड एफएम पॉडकास्टशी बोलताना सांगितल्या. “आम्ही हैदराबादमध्ये शूटिंग करायचो. तेव्हा सलमान खानही खूप जास्त काम करत होता. तो दररोज रात्री ऐश्वर्याला भेटायला यायचा आणि सकाळी निघून जायचा,” असं हिमानी यांनी सांगितलं.
ऐश्वर्याबद्दल हिमानी शिवपुरी म्हणाल्या, “ती खूप छान होती. ती खूप वाचायची आणि आम्ही खूप गप्पा मारायचो. ती फक्त सुंदरच नाही, तर व्यक्ती म्हणूनही ती खूप चांगली आहे असं मला वाटतं.”
सलमान व ऐश्वर्याच्या नात्याबद्दल हिमानी म्हणाल्या….
सलमान आणि ऐश्वर्या यांच्या ब्रेकअपबद्दल विचारलं असता त्यांनी फार बोलणं टाळलं. “त्यांचं नातं यशस्वी झालं नाही. त्यांच्यात काय समस्या होत्या हे त्यांनाच जास्त चांगलं ठाऊक असेल,” असं त्या म्हणाल्या.

हिमानी यांनी एक किस्सा सांगितला. “मला आठवतंय की एकदा आम्ही फिल्म सिटीमध्ये शूटिंग करत होतो. ऐश्वर्या अभिषेकबरोबर रोहन सिप्पीच्या चित्रपटाचे शूटिंग करत होती आणि सलमान आला होता. तो मला म्हणाला होता, ‘हिला समजावून सांगा. तिला वाटतं की ती खूप सुंदर आहे. तिला वहीदा रहमान यांच्याकडे पाहायला सांगा.’ मी त्याला शांत राहायला सांगायचे,” असं हिमानी शिवपुरी म्हणाल्या.
बॉलीवूड हंगामाशी बोलताना हिमानी यांनी सलमान खानबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला होता. “सलमान खानबरोबर काम करणं हा खूप चांगला अनुभव होता. तो त्याच्या घरून जेवण आणायचा. बिर्याणी आणि इतर पदार्थ आणायचा. ‘हम आपके हैं कौन’च्या सेटवर फक्त शाकाहारी जेवणच असायचे, म्हणून, तो ईदला बिर्याणी आणायचा आणि आम्ही सर्वजण ती खायचो. तो खूप मस्करी करायचा,” असं हिमानी शिवपुरी म्हणाल्या होत्या.