‘बॉर्डर २’ या बहुचर्चित चित्रपटामध्ये अनेक प्रसिद्ध कलाकारांची वर्णी लागली आहे. यापूर्वी आलेल्या ‘बॉर्डर’ चित्रपटात सनी देओल, सुनील शेट्टी, जॅकी श्रॉफ यांसारखे इतर कलाकारही या चित्रपटातून महत्त्वाच्या भूमिकेत झळकले होते. आता ‘बॉर्डर २’मध्ये सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोझांज, अहान शेट्टी यांसारखे कलाकार झळकणार आहेत.
‘बॉर्डर २’ चित्रपटातील कलाकारांच्या यादीत आता अजून एका कलाकाराचं नाव जोडलं गेलं आहे. ‘पिंकव्हिला’च्या वृत्तानुसार ‘बॉर्डर २’मध्ये अभिनेत्री सोनम बाजवासुद्धा झळकणार आहे. सोनम ‘बॉर्डर २’मध्ये एका पंजाबी मुलीची भूमिका साकारणार असून ती दिलजीत दोझांजसह झळकणार आहे, त्यामुळे यातील सोनम व दिलजीत यांची केमिस्ट्री कशी असेल हे पाहणं रंजक ठरेल. या वृत्तानुसार सोनम जून महिन्याच्या शेवटी या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. नुकतीच अभिनेत्री ‘हाऊसफुल ५’मध्ये झळकली. सध्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘हाऊसफुल ५’ नंतर सोनम ‘बॉर्डर २’मधून पाहायला मिळणार आहे.
अनुराग सिंग दिग्दर्शित ‘बॉर्डर २’ हा चित्रपट २६ जानेवारी २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘बॉर्डर २’ मधून वरुण धवन, दिलजीत दोझांज, अहान शेट्टी, सोनम बाजवा यांसारखे कलाकार झळकणार आहेत, त्यामुळे हे नक्की कोणत्या भूमिकेत असतील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. आपल्याकडे देशभक्तिवर आधारित अनेक चित्रपट आहेत, पण स्वातंत्र्य दिन असो किंवा प्रजासत्ताक दिन, ‘बॉर्डर’ चित्रपटाची आठवण आवर्जून काढली जाते. यामधील गाणी या दिवसांत आवर्जून लावली जातात. ‘बॉर्डर’मधील ‘संदेसे आते है’ हे गाणं त्याकाळी तर प्रचंड गाजलंच होतं, पण आजही अनेक जण हे गाणं तितक्याच आवडीने ऐकतात. १९९७ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन जे. पी. दत्ता यांनी केलं होतं.
दरम्यान, अभिनेत्री सोनम बाजवाबद्दल सांगायचं झालं तर तिने आजवर अनेक पंजाबी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. हिंदीतही तिने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तिने ‘पंजाब १९८४’, ‘सरदार जी २’, ‘निक्का झैलदर’, ‘कॅरी ऑन जट्टा २’, ‘होंसला रख’; तर हिंदीत ‘स्ट्रीट डान्सर 3D’ आणि ‘बाला’ या चित्रपटांत काम केलं होतं. आता लवकरच अभिनेत्री ‘बॉर्डर २’मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे.