गोवर्धन असरानी अर्थात असरानी यांचं वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झालं. असरानी यांनी आत्तापर्यंत विविध चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. मागची तीन ते चार दशकं आपल्या सगळ्यांनाच हसवणारा कलाकार आता आपल्यातून निघून गेला आहे. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने सगळी सिनेसृष्टी हळहळली. ‘शोले’ चित्रपटातील जेलरच्या भूमिकेमुळे असरानी घराघरांत पोहचले. त्यांना ही भूमिका कशी मिळाली? आपण जाणून घेऊ. रमेश सिप्पी यांनी याबाबतचा किस्सा सांगितला आहे.

रमेश सिप्पी काय म्हणाले?

असरानी यांच्या निधनाचं वृत्त माझ्यासाठी खरंच धक्कादायक ठरलं. कारण अगदी काही दिवसांपूर्वी पर्यंत मी त्यांना पाहिलं होतं, भेटलो होतो. असरानी यांची प्रकृती व्यवस्थित होती. त्यांचं निधन होईल असं वाटलं नव्हतं. असरानी यांनी खूप काम केलं. अनेक चित्रपटांमधून भूमिका साकारल्या. मात्र शोले सिनेमातला जेलर ही त्यांची ओळख बनली.

Asrani Death
असरानी यांनी साकारलेली जेलरची व्यक्तिरेखा खूप गाजली. पाच दशकांंनीही ती लोकांच्या स्मरणात आहे. (फोटो-इंडियन एक्स्प्रेस)

‘शोले’तला जेलरचा रोल असरानी यांना कसा मिळाला?

‘शोले’ चित्रपटातील अंग्रेजो के जमाने का जेलर असरानी यांना मिळाला कारण त्यांनी बहुदा त्यासाठीच जन्म घेतला असावा. ऑगस्ट महिन्यात शोले चित्रपटाला ५० वर्षे पूर्ण झाली. त्यावेळी असरानी यांच्या जेलरच्या भूमिकेलाही ५० वर्षे पूर्ण झाली. पाच पिढ्या त्यांच्यावर लोकांनी प्रेम केलं. शोलेमधली जेलरची भूमिका चार्ली चॅप्लिन यांच्या द ग्रेट डिक्टेटरच्या भूमिकेवरुन प्रेरित होती. आपल्याला माहीत आहेच की चॅप्लिन यांचा तो सिनेमा हिटरलवर बेतलेलला होता. शोले हा चित्रपट सलीम जावेद यांनी लिहिला तेव्हा त्यात जेलरची भूमिका अशा प्रकारे विनोदी ढंगाची असावी असं त्यांना वाटत होतं. त्याप्रमाणे ती भूमिका लिहिली गेली आणि असरानी यांना त्या भूमिकेने अमाप प्रसिद्धी दिली. एनडीटीव्ही ने हे वृत्त दिलं आहे.

जेलरच्या भूमिकेसाठी असरानी यांच्या नावावर एकमत

सलीम-जावेद यांनी जेव्हा जेलरची व्यक्तिरेखा लिहिली तेव्हा यात कलाकार म्हणून कुणाला घ्यायचं? याची चर्चा सुरु झाली. त्यावेळी सगळ्यांच्या डोक्यात असरानी यांचं नाव आलं आणि आम्ही त्यांना फोन केला. त्यांना रोल समजावून सांगितला, असरानी भूमिका ऐकून खुश झाले आणि त्यांनी ती करायला लगेच होकार दिला. असरानी यांनी हिटलरची छाप न पडू देता विनोदी ढंगाने जेलरची भूमिका साकारली. त्यामुळेच त्यांची भूमिका कॉपी आहे असं वाटत नाही. या भूमिकेवर लोकांनी अतोनात प्रेम केलं. जेव्हा शोले बाबत लेख लिहिले गेले, पुस्तकं लिहिली गेली तेव्हा त्यात असरानी यांनी साकरलेल्या जेलरच्या भूमिकेचा उल्लेख आवर्जून असे. त्यामुळे हे पात्र लोकांना किती आपलंसं वाटलं होतं याची साक्ष पटते अशी आठवण रमेश सिप्पी यांनी सांगितली. तसंच जेलरच्या तोंडी असलेला संवाद ‘हम अंग्रेजो के जमाने के जेलर है’ हा खूप गाजला. सलीम जावेद यांनी लिहिलेला हा संवाद आणि ही भूमिका असरानी यांनी अजरामर केली यात शंका नाही.