Pinkie Roshan on Zarine Khan: सुझान खान व झायेद खान यांची आई जरीन खान यांचे ७ नोव्हेंबर रोजी निधन झाले. त्या ८१ वर्षांच्या होत्या. सुझेन खान ही हृतिक रोशनची पहिली पत्नी आहे. त्यांचा घटस्फोट झाला आहे. असे असले तरी त्या दोघांमध्ये उत्तम मैत्री आहे. तसेच, दोन्ही कुटुंबात चांगले नाते असल्याचे पाहायला मिळत आहे.

जरीन खान यांच्या मृत्यूनंतर हृतिकच्या आईने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करीत जरीन खान यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच, त्यांच्यामध्ये असणार्‍या मैत्रीबद्दलही त्यांनी वक्तव्य केले. सुझेन व हृतिक यांचा घटस्फोट झाला असला तरीही त्यांच्यात उत्तम मैत्री होती.

जरीन खान यांच्या आठवणीत पिंकी रोशन यांनी लिहिले, “एक अतिशय दुर्मीळ मैत्रीण, एक अतिशय मौल्यवान नातं होतं. जेव्हा आमच्या मुलांनी त्यांचे नातं मैत्रीपासून पुढे न्यायचं ठरवलं आणि एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी आम्ही खूप आनंदी होतो. पण, नियतीला दुसरंच काहीतरी मान्य होतं. “

“आमची मुलं वेगळी झाली…”

पुढे पिंकी रोशन यांनी लिहिले, “आमची मुलं वेगळी झाली. ते त्या कठीण काळातून जात असताना आम्ही आमच्यात कटुता येऊ दिली नाही. त्यापेक्षा आम्ही एकमेकांना सहानुभुती दिली. एकमेकांबरोबर खंबीरपणे उभ्या राहिलो. आम्ही एकमेकींची समजूत घातली. एकमेकांचं दु:ख समजून घेतलं. एकमेकींना मिठी मारली. एकमेकींचे अश्रू पुसले. या सगळ्यामुळे आम्ही एकमेकींच्या खूप जवळ आलो. आमच्यातील बॉण्डिंग अजून चांगलं झालं.”

पिंकी रोशन यांनी त्यांच्या भावना व्यक्त करीत लिहिले, “जरीन मला तुझी खूप आठवण येईल.” असे लिहिताना त्यांनी एक ग्रुप फोटो शेअर केला आहे.

हृतिक रोशन आणि सुझान खान यांचे लग्न २००० मध्ये झाले होते. लग्नानंतर १४ वर्षांनी ते वेगळे झाले. मात्र, विभक्त झाल्यानंतरही त्यांच्यात उत्तम मैत्री आहे. हृधान रोशन आणि हृहान रोशन या दोन्ही मुलांचे ते सह-पालकत्व करतात.

७ नोव्हेंबर रोजी जरीन खान यांचे जुहू येथील राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. जरीन यांनी काही काळ अभिनय क्षेत्रात काम केले. १९६३ ला प्रदर्शित झालेल्या तेरे घर के सामने आणि १९६९ ला प्रदर्शित झालेल्या एक फूल दो माली यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते. १९६६ मध्ये त्यांनी संजय खानशी लग्न केले. त्यानंतर त्या चित्रपटांपासून दूर गेल्या. त्यांनी लग्नानंतर इंटेरियर डिझायनिंगमध्ये यशस्वीरीत्या काम केले.