Rakesh Roshan dance on Hrithik Roshan’s Aavan Jaavan song: राकेश रोशन यांना बॉलीवूडमध्ये प्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक म्हणून ओळखले जाते. काही वर्षे अभिनय क्षेत्रात काम केल्यानंतर त्यांनी दिग्दर्शनाकडे मोर्चा वळवला. ‘कोई मिल गया’सारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी केले. या चित्रपटात त्यांचा मुलगा हृतिक रोशन प्रमुख भूमिकेत दिसला होता.
हृतिक रोशन व राकेश रोशन यांच्यातील नाते अनेकदा प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेते. ते अनेक कार्यक्रमांच्या ठिकाणी एकत्र हजेरी लावतात. राकेश रोशन यांनी अनेकदा विविध मुलाखतींमध्ये हृतिक रोशनबाबत वक्तव्य केले आहे.
परंतु, आता राकेश रोशन एका वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आले आहेत. सोशल मीडियावर राकेश रोशन यांचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. ७५ वर्षीय राकेश रोशन मुलगा हृतिक रोशनच्या चित्रपटातील एका गाण्यावर डान्स करीत आहेत.
अभिनेता हृतिक रोशनने एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओमध्ये राकेश रोशन यांनी लाल रंगाचा शर्ट, निळ्या रंगाची पँट, गळ्यात पांढरा रुमाल व डोक्यावर हॅट, असा लूक केल्याचे पाहायला मिळत आहे.
व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, एका डान्स ग्रुपबरोबर उभे आहेत. तितक्यात हृतिकच्या ‘वॉर २’ चित्रपटातील ‘आवां जावां’ गाण्याचा आवाज येतो आणि राकेश रोशन त्यावर थिरकताना दिसतात. विशेष म्हणजे ते हृतिकसारख्याच डान्स मूव्ह्ज करताना दिसत आहेत. तसेच त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. महत्त्वाचे म्हणजे काही दिवसांपूर्वीच त्यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया झाली आहे.
हा व्हिडीओ शेअर करताना हृतिक रोशनने लिहिले, “अविश्वसनीय! तुम्ही खूप सुंदर डान्स केला आहे.” पुढे अभिनेत्याने राकेश रोशन यांना टॅग करत लिहिले, “माझे वडिलही काही कमी नाहीत.”
राकेश रोशन यांचा हा व्हिडीओ पाहून अनेक नेटकरी कमेंट्स करताना दिसत आहेत. राकेश रोशन यांच्यावर ls कौतुकाचा वर्षाव करताना दिसत आहेत. तर काहींनी हृतिकच्या यशाचा त्यांना अभिमान वाटत असल्याचेदेखील त्यांनी लिहिले आहे.


दरम्यान, हृतिक रोशनच्या ‘वॉर २’ चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, हा एक अॅक्शन चित्रपट आहे. हृतिकबरोबरच दाक्षिणात्य साऊथ सुपरस्टार ज्युनियर एनटीआरदेखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. त्याबरोबरच अभिनेत्री कियारा अडवाणीदेखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट १४ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.