Director revealed why he slapped Raj Kapoor: दिग्दर्शक किदार शर्मा व अभिनेता-दिग्दर्शक पृथ्वीराज कपूर हे जवळचे मित्र होते. त्यांचे एकमेकांशी इतके घट्ट नाते होते की, पृथ्वीराज कपूर यांनी त्यांचा मुलगा राज कपूर यांना सरळ मार्गावर आणण्यासाठी किदार शर्मा यांच्यावर विश्वास ठेवला.
किदार शर्मा यांनी प्रसार भारती अर्काइव्हला मुलाखत दिली होती. त्यावेळी त्यांनी राज कपूर यांचा एक किस्सा सांगितला होता. ते म्हणालेले, “पृथ्वीराज कपूर त्यांचा मुलगा राज कपूरमुळे अस्वस्थ होते. त्यांना मी कधीही त्यांच्या आयुष्यात चिंतेत असल्याचं पाहिलं नव्हतं. एकदा ते विचार करीत बसले होते. मी त्यांना काय झाले, असे विचारले होते. त्यावर ते म्हणाले की, एक खासगी गोष्ट आहे. त्यावर मी त्यांचा जवळचा मित्र आहे आणि ते मला काहीही सांगू शकतात, असे सांगितले.”
“घरात इतका भित्रा…”
“माझे बोलणे ऐकल्यानंतर पृथ्वीराज कपूर म्हणालेले, “माझा मुलगा राज सध्या किशोरवयीन अवस्थेत आहे. त्याला पक्षी आणि मधमाश्यांबद्दल सर्व काही जाणून घ्यायचे आहे. त्यानं अभ्यास सोडला आहे. तो दिवसेंदिवस बिघडत चालला आहे. मी घरात इतका भित्रा आहे की, मी त्याच्यावर हात उचलू शकत नाही. मला काय करावं, हे सुचत नाही.”
“मी पृथ्वीराज कपूर यांना सांगितले की, तुमच्या मुलाला माझ्याकडे सोपवा. मी शाळेच्या शिक्षकांप्रमाणे आहे, मी त्याला सरळ मार्गावर आणेन. फक्त तुम्ही आमच्यामध्ये कोणतीही ढवळाढवळ करायची नाही, त्यावर त्यांनी सहमती दर्शवली. राज कपूर माझा शिष्य बनला. त्यानं माझा आशीर्वाद घेतला. मी त्याला सांगितलं की, तो माझा तिसरा असिस्टंट आहे. तो स्क्रिप्ट लिहू शकतो आणि त्यानंतर त्याला सेटवर शूटिंगदरम्यान टाळी वाजवण्याची संधी मिळेल. “
“काही दिवसांनंतर मी विचार केला की, हा मुलगा हुशार आहे, छान दिसतो आणि माझ्या जवळच्या मित्राचा मुलगा आहे. पण, तरीही मला त्याच्यावर लक्ष ठेवावं लागेल. एकदा पृथ्वीराज यांच्या गौरी या चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं. त्यावेळी मी राजला क्लॅपबोर्ड दाबण्याची जबाबदारी दिली. यादरम्यान मी पाहिलं की, राज खूप छान तयार होत असे. तो केस व्यवस्थित विंचरत असे; पण तो कामावर लक्ष देत नसे. मी त्याचं हे सर्व वागणं सहन करीत असे.”
पुढे काय घडले हे सांगत किदार शर्मा म्हणालेले, “एक दिवस आम्हाला ४० मैल प्रवास करायचा होता. त्याआधी एक छोट्या सीनचं शूटिंग करायचं होतं. मी त्याला सांगितलं की, आज असं काही करू नको. तरीही त्यानं ऐकलं नाही. तो व्यवस्थित तयार झाला; पण त्यानं कामावर लक्ष दिलं नाही. अभिनेत्याची दाढी क्लॅपबोर्डमध्ये अडकली. जेव्हा त्यानं तो गुंता सोडवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ती दाढी त्या क्लॅपबोर्डबरोबर ओढली गेली. मला तो सर्व प्रकार सहन झाला नाही.”
“मी त्याला माझ्याकडे बोलावले आणि जोरात…”
“मी त्याला माझ्याकडे बोलावले आणि जोरात कानाखाली मारली. माझी बोटं त्याच्या चेहऱ्यावर उठली होती. मला वाटलेलं की, तो आरडाओरडा करील. कारण- तो एका मोठ्या अभिनेत्याचा मुलगा आहे आणि मी त्याला सर्वांसमोर मारलं; पण तसं घडलं नाही. तो हसला आणि निघून गेला.”
“मी त्या रात्री झोपू शकलो नाही. मला वाटलं की, या मुलाला स्वत:ला स्क्रीनवर पाहायचं आहे. मी त्याला मारायला नको होतं. मी सकाळी उठलो आणि टाईपरायटरकडून नायकासाठीचा करारनामा लिहून घेतला. मला त्यावेळी नीलकमल चित्रपट बनवायचा होता. मी राजला प्रमुख भूमिकेत घ्यायचं ठरवलं. त्यानंतर मी राजला भेटलो तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर मारल्याची निशाणी दिसत होती.”
राज कपूर यांना मिळाला कारकिर्दीतील पहिला चित्रपट
दिग्दर्शक पुढे म्हणालेले, “मी त्याला जवळ बोलावलं. तो म्हणाला की, तुम्ही पुन्हा माराल. मी त्याला आश्वस्त केलं की, मी त्याला मारणार नाही. त्याला चित्रपटाची ऑफर दिली. ५,००० रुपये मानधन दिलं. १३ वर्षांच्या मधुबालाला नायिका म्हणून निवडलं.”
जमीन विकली, माझ्या पत्नीचे दागिने विकले अन्…
मी एका नवीन कलाकाराला घेऊन चित्रपट बनवत असल्याचे समजल्यावर निर्मात्यानं पैसे गुंतवण्यास नकार दिला; पण मला तो चित्रपट बनवायचा होता. मी माझी जमीन विकली, माझ्या पत्नीचे दागिने विकले आणि माझ्याजवळ जे काही होते, ते सर्व काही विकले; पण तरीही पुरेसे पैसे नव्हते. याचदरम्यान, अभिनेत्री नाझिया बीबी यांनी यांनी महिन्याला तिचे मानधन द्यावे, अशी मागणी केली; पण मी त्यांना परत पाठवले. जेव्हा त्यांना माहीत झाले की, माझ्याकडे पैसे नाहीत. त्यावेळी त्या त्यांनी साठवलेले १७ हजार रुपये व दागिने घेऊन आल्या आणि चित्रपटाला बनवण्यासाठी ते पैसे वापर, असे सांगितले.”
