Irrfan Khan reply to Pakistani Journalist : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत केलेल्या प्रत्युत्तर कारवाईनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव आहे. तसेच २६ निष्पाप लोकांचे जीव घेणाऱ्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने अनेक मोठे निर्णय घेतले आणि पाकिस्तानला मोठा धक्का दिला. तिथल्या मोठ्या निर्णयांपैकी एक सेलिब्रिटींशी संबंधित होता. पाकिस्तानी कलाकारांनी भारतात काम करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. याचदरम्यान, दिवंगत अभिनेते इरफान खान यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्यांनी दिलेलं उत्तर लोकांनी मनं जिंकत आहे.
इरफान खान आता या जगात नाही, पण त्याच्या जुन्या आठवणी अजूनही लोकांना हसवतात आणि कधी कधी रडवतात. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावादरम्यान, त्यांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका पाकिस्तानी पत्रकाराने त्यांना त्यांच्या देशात येण्याचे आमंत्रण दिले होते. त्यानंतर त्यांनी दिलेल्या उत्तराची त्यावेळी चांगलीच चर्चा झाली होती.
पाकिस्तानी पत्रकाराने काय म्हटलं होतं?
व्हिडीओमध्ये पाकिस्तानी रिपोर्टर इरफानला म्हणतो, “हॅलो इरफान भाई, तुमचे पाकिस्तानात खूप फॉलोअर्स आहेत. तुम्ही कधीतरी पाकिस्तानला आले असता तर… जर असं घडलं तर ती खूप आनंदाची गोष्ट असेल.”
इरफान खान यांचं उत्तर
पत्रकाराचं बोलत असताना मध्येच इरफान खान यांनी त्याला उत्तर दिलं. “मी येईन, पण मी परत येऊ शकेन का?” असं इरफान म्हणाले. त्यांचं हे उत्तर ऐकून पत्रकार व उपस्थित सर्वजण हसू लागले.
इरफान खान यांचा हा व्हिडीओ एक्सवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. या व्हिडीओचं कॅप्शनही लक्षवेधी आहे. ‘आता आपल्याजवळ S-400 आहे आणि तेव्हा आपल्याकडे पाकिस्तानला गप्प करायला इरफान खान होते,’ असं कॅप्शन एक्सवर व्हिडीओ शेअर करणाऱ्या युजरने दिलं आहे.
पाकिस्तानी कलाकारांवर भारतात बंदी
ऑपरेशन सिंदूरबद्दल पाकिस्तानी कलाकारांनी अपमानजनक वक्तव्ये केली होती, त्यानंतर भारतात पाकिस्तानी अभिनेते व अभिनेत्रींवर बंदी घालण्यात आली आहे. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान इरफान खान यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.