Mahima Chaudhary Viral Video: सध्या अनेक कलाकार घटस्फोट घेत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यातच आता ५२ वर्षीय महिमा चौधरीचा असा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामुळे तिने लग्न केले आहे का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
सोशल मीडियावर महिमा चौधरी आणि संजय मिश्रा यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये दोघांनीही नवरा आणि नवरीच्या वेशभूषेत दिसत आहेत. महिमाने लाल रंगाचे कपडे परिधान केले आहे. या वेशभूषेत त्यांनी एकत्र पापाराझींना फोटोंसाठी पोज दिली.
या व्हिडीओमध्ये महिमा पापाराझींना म्हणते की तुम्ही लग्नाला आला नाहीत ना? तर तुम्ही मिठाई खाऊन जा. त्यावर संजय मिश्रा म्हणतात की, आणखी बरेच काही आहे.
तसेच पापाराझी त्यांना लग्नाच्या शुभेच्छा देत आहेत. त्यानंतर महिमा पापाराझींना असेही म्हणते की, अजून कोणाला लग्न करायचे आहे का? इथे सामूहिक विवाहसोहळा सुरू आहे. त्यानंतर संजय मिश्रा व महिमा चौधरी हसताना दिसत आहेत. आता व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना असा प्रश्न पडला आहे की, महिमा चौधरीने खरंच संजय मिश्रा यांच्याशी लग्नगाठ बांधली आहे का?
आता खरंच महिमा चौधरी आणि संजय मिश्रा यांनी लग्नगाठ बांधली आहे का? तर याचे उत्तर नाही असे आहे. महिमा आणि संजय मिश्रा यांचा एक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाचे नाव दुर्लभप्रसाद की दुसरी शादी असे आहे. या चित्रपटातील भूमिकेत या दोन कलाकारांनी पापाराझींसमोर फोटोंसाठी पोज दिली आहे.
काही दिवसांपूर्वीच महिमाने दुर्लभप्रसाद की दुसरी शादी चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर केले होते. यामध्ये संजय मिश्रादेखील त्यांच्या भूमिकेत दिसले होते. यामध्ये ५० वर्षांच्या व्यक्तीच्या लग्नाची पत्रिका छापली जात असल्याचे दिसत आहे. हे पोस्टर शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शन देत लिहिले होते की नवरी मिळाली आहे, आता तयार व्हा; कारण लवकरच वरात येणार आहे. या चित्रपटात व्योम आणि पलक लालवानीदेखील दिसणार आहेत.
आता हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. “हे काय केले?”, “हा व्हिडीओ पाहून मला आधी धक्का बसला होता. कमेंट्स वाचून कळले की ते चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत”, “मला तर धक्का बसला होता”, “मला तर हे खरे वाटले होते”, “सांगा की हे खोटे आहे”, “खरंच”, “हे खोटे आहे”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत; तर अनेकांनी ते चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत असे लिहिले आहे, त्यामुळे इतर नेटकऱ्यांना नेमका प्रकार समजला आहे.
दरम्यान, हा चित्रपट डिसेंबर २०२५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो.
