Ismail Darbar Angry Reaction On Sanjay Leela Bhansali : बॉलीवूडच्या काही प्रसिद्ध व लोकप्रिय दिग्दर्शकांपैकी एक म्हणजे संजय लीला भन्साळी. दिग्दर्शक असण्याबरोबरच संजय लीला भन्साळी यांना संगीताचीसुद्धा तितकीच जाण आहे. ते अनेकदा स्वतःच्या चित्रपटांसाठी स्वत:च संगीत देतात. २०१८ मध्ये आलेल्या त्यांच्या ‘पद्मावत’मधील संगीतासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला आहे.

एक काळ असा होता, जेव्हा संगीत क्षेत्रात संजय लीला भन्साळी आणि इस्माईल दरबार यांची जोडी उत्तम मानली जायची. मात्र, आता या दोघांमध्ये काहीतरी बिनसलं आहे. इस्माईल दरबार यांनी संजय लीला भन्साळींच्या ‘हम दिल दे चुके सनम’ व ‘देवदास’ या अत्यंत लोकप्रिय व गाजलेल्या चित्रपटांना संगीत दिलं होतं.

या दोन चित्रपटांनंतर भन्साळी आणि दरबार यांनी पुन्हा एकत्र काम केलं नाही. त्याचबद्दल संगीत दिग्दर्शक इस्माईल दरबार यांनी विक्की ललवानींच्या यूट्यूब चॅनेलवरील मुलाखतीमध्ये सांगितलं आहे. यावेळी दरबार यांनी संजय लीला भन्साळींना गर्विष्ठ म्हटलं. तसंच त्यांनी, “१०० कोटी रुपये ऑफर केले, तरी भन्साळींबरोबर काम करणार नाहीत”, असंही म्हटलं.

२००० च्या सुरुवातीच्या काळात जेव्हा संजय लीला भन्साळी ‘हीरामंडी’वर काम सुरू करीत होते, तेव्हा ‘हम दिल दे चुके सनम’च्या यशानंतर त्यांनी इस्माईल दरबार यांना संगीतकार म्हणून निवडलं होतं. मात्र, त्याचदरम्यान एका वृत्तपत्रात आलेल्या बातमीत असं छापून आलं, ” ‘हीरामंडी’तली विशेष गोष्ट म्हणजे इस्माईल दरबारचं संगीत”. ही बातमी वाचून भन्साळी संतापले. त्यांना वाटलं की, ही बातमी दरबारनेच मुद्दाम प्रसिद्धीसाठी छापली आहे.

त्याबद्दल दरबार म्हणाले, “ती बातमी मी दिली नव्हती. त्यामुळे मी त्याला (संजय लीला भन्साळी) स्पष्ट सांगितलं की, जर ही बातमी मला द्यायचीच असती, तर मी स्वत:च सांगितलं असतं की, हो… ही मीच दिली आहे म्हणून; पण ती बातमी कोणी दिली होती हे मला आजही माहीत नाही. नंतर त्यानं मला ऑफिसमध्ये बोलावलं आणि विचारलं – ‘इस्माईल, तू असं कसं बोलू शकतोस?’ त्यानंतर तो म्हणाला – ‘जाऊ दे, विसरून जा.'”

पुढे ते सांगतात, ” ‘हम दिल दे चुके सनम’ व ‘देवदास’ या चित्रपटांचा ‘बॅकबोन’ म्हणजे इस्माईल दरबार… आणि हे मी म्हणत नाहीये, त्याचेच PR म्हणत होते. अनेक वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर अशा बातम्या आल्या होत्या. आज भन्साळी जर माझ्याकडे येऊन म्हणाला की, माझ्या चित्रपटासाठी संगीत दे, मी १०० कोटी देतो. तर, मी त्याला सरळ म्हणेन की, ‘इथून निघून जा!”

दरम्यान, ‘गुजारिश’ चित्रपटासाठी दरबार आणि भन्साळी पुन्हा एकत्र येणार होते; पण ‘हम दिल दे चुके सनम’दरम्यान झालेले त्यांचे वाद ‘देवदास’ चित्रपटादरम्यानच वाढले होते. त्यामुळे ‘गुजारिश’साठी भन्साळींनी स्वत:चं संगीत दिलं.