Jacqueline Fernandez Video : मनोरंजन क्षेत्रातील काही कलाकार मंडळी ही अभिनय क्षेत्रात सक्रीय असण्याबरोबरच आपलं सामाजिक भानही जपताना दिसतात. अनेक समजोपयोगी काम करत ते गोगरिबांसाठी मदत करताना दिसतात. अशा काही कलाकारांपैकी एक म्हणजे, अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस.

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने अलीकडेच एका दुर्मीळ आजार असलेल्या एका चिमुकल्याची भेट घेतली. यावेळी जॅकलिनने चिमुकल्याबरोबर आणि त्याच्या कुटुंबाबरोबर वेळ घालवला. इतकंच नाही तर त्या चिमुकल्याच्या संपूर्ण उपचाराचा खर्च उचलण्याची जबाबदारीही घेतली.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये जॅकलिन त्या मुलाबरोबर खेळताना आणि संवाद साधताना दिसत आहे. या मुलाला ‘हायड्रोसेफालस’ नावाचा एक दुर्मीळ आजार आहे. या आजारात मेंदूतील सेरेब्रोस्पायनल फ्लुइड (CSF) म्हणजेच मेंदूत अति प्रमाणात पाणी साचते आणि त्यामुळे Brain Tissues वर दाब निर्माण होतो.

सोशल मीडिया इन्फ्लुइन्सर आणि समाजसेवक हुसैन मन्सुरींनी जॅकलिनचा मुलाबरोबरचा व्हिडीओ शेअर केला असून, या व्हिडीओसह ते म्हणतात, “जॅकलिन फर्नांडिसजी, या मुलाच्या उपचाराचा खर्च उचलण्याची जबाबदारी घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्ही खरोखरच एक निर्मळ मनाची व्यक्ती आहात. सगळं छान होईल अशी आशा आहे. कृपया या छोट्याशा बाळासाठी प्रार्थना करा.”

या व्हिडीओवर उत्तर देताना जॅकलिनने लिहिले, “धन्यवाद हुसैन भाऊ. चला आपण सगळे मोहम्मद आणि त्याच्या कुटुंबासाठी प्रार्थना करू”. तर या व्हिडीओवर अभिनेत्री अनुषा दांडेकर हिनेही प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणते, “हा गोड देवदूत आणि जॅकी, तुम्हा दोघांवर खूप खूप प्रेम.” दरम्यान, या व्हिडीओवर जॅकलिनच्या अनेक चाहत्यांनी प्रतिक्रियांमधुन त्यांचं प्रेम व्यक्त केलं आहे.

एका चाहत्याने म्हटलं की, “लवकरच हे बाळ खेळताना, बागडताना पाहायला मिळो हीच इच्छा. तुम्हा दोघांचंही कौतुक”, तर दुसरा असं म्हणतो की, “चला आपण सगळे या बाळासाठी प्रार्थना करू. देव त्याला आशीर्वाद देवो.” यासह अनेक चाहत्यांनी जॅकलिनच्या या कृतीचं कौतुक केलं आहे. तसंच या सामाजिक कार्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.

दरम्यान, जॅकलिन अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग घेते. याआधीही PETA Asia (प्राणी हक्कांसाठी काम करणारी संस्था) आणि प्रथम NGO (मुलांच्या शिक्षणासाठी कार्यरत संस्था) यांच्याअंतर्गत सामाजिक कार्य करते. तसंच तिने Habitat for Humanity या संस्थेबरोबर ‘Jacqueline Builds’ ही मोहीम सुरू केली होती, ज्यामार्फत पुरग्रस्तांना मदत केली गेली. तसंच जॅकलिन ध्यानधारणा, मानसिक आरोग्य आणि सेल्फ केअर या विषयांवरही सतत मोहिमा राबवत असते आणि लोकांना मानसिक आरोग्याचं महत्त्व समजावते.

जॅकलिनच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास, ती ‘वेलकम टू द जंगल’ या आगामी चित्रपटात झळकणार आहे. हा ‘वेलकम’ या हिट फ्रँचायझीचा तिसरा भाग आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अहमद खान करत असून, फिरोज नाडियाडवाला यांनी निर्मिती केली आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, संजय दत्त, सुनील शेट्टी, परेश रावल, रवीना टंडन, दिशा पाटनी, लारा दत्ता यांच्यासह अनेक कलाकार मंडळी पाहायला मिळणार आहेत.