बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या चर्चेत आहे. याचं कारण म्हणजे कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील तिचं पदार्पण. करण जोहरची निर्मिती असलेल्या ‘होमबाऊंड’ चित्रपटाच्या निमित्ताने जान्हवीने करण जोहर, इशान खट्टर यांच्यासह कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी तिच्या लूकची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा झाली.
अशातच आता जान्हवी कपूर लवकरच एका नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राज मेहता दिग्दर्शित व करण जोहरची निर्मिती असलेल्या ‘लग जा गले’ या चित्रपटातून जान्हवी कपूर व अभिनेता टायगर श्रॉफ पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. ‘गुड न्यूज’ आणि ‘जुग जुग जीयो’ या चित्रपटांनंतर दिग्दर्शक राज मेहता यांचा ‘लग जा गले’ हा चित्रपट येणार आहे. ‘पिंकव्हिला’च्या वृत्तानुसार ‘लग जा गले’ हा चित्रपट एक अॅकश्न लव्हस्टोरी असणार आहे. गेल्या काही दिवसांपासून चित्रपटाच्या कथेवर काम सुरू असून या चित्रपटासाठी त्यांना अशी जोडी हवी होती, ज्यांनी पूर्वी एकत्र काम केलेलं नाहीये.त्यामुळे या चित्रपटाकरता त्यांनी जान्हवी कपूर व टायगर श्रॉफ यांना विचारलं आणि स्क्रिप्ट ऐकल्यानंतर दोघांनीही चित्रपटासाठी लगेच होकार दिला.
जान्हवी व टायगर हे दोघे पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. यापूर्वी त्यांनी कधीही एकत्र काम केलं नव्हतं, त्यामुळे या फ्रेश जोडीची ऑनस्क्रिन केमिस्ट्री कशी असेल हे पाहणं रंजक ठरेल. जान्हवी व टायगर यांनी जरी एकत्र काम केलं नसलं तरी त्यांच्या पालकांनी मात्र अनेकदा एकत्र चित्रपटांमध्ये काम केलं आहे. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी व अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी ‘कर्मा’, ‘रूप की रानी चोरों का राजा’, ‘हल्ला बोल’, ‘मैं तेरा दुश्मन’, ‘जवाब हम देंगे’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे.
दरम्यान, जान्हवी कपूरच्या आगामी कामाबद्दल बोलायचं झालं तर ती तुषार जलोटा दिग्दर्शित ‘परमसुंदरी’ या चित्रपटात झळकणार आहे. यामध्ये तिच्यासह अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत असणार आहे. यानंतर ती अजून एका चित्रपटातून झळकणार आहे. शशांक खेतान दिग्दर्शित ‘सनी संस्कार की तुलसी कुमारी’ या चित्रपटात ती पाहायला मिळणार आहे.