Janhvi Kapoor Mobbed at Lalbaugcha Raja : जान्हवी कपूर आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचा ‘परम सुंदरी’ हा चित्रपट आज शुक्रवारी (२९ ऑगस्ट) थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. अशातच चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी दोघांनी ‘लालबागचा राजा’चंही दर्शन घेतलं. त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
जान्हवीने यावेळी पैठणी साडी नेसली होती आणि त्यावर नथ, चंद्रकोर असा मराठमोळा लूक केला होता. सिद्धार्थसुद्धा पारंपरिक पोशाखात तिथे उपस्थित होता. जान्हवीच्या मागे उभा राहून तो गर्दीत तिची काळजी घेताना दिसला. परंतु, या व्हिडीओमध्ये जान्हवीच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी दरवर्षी भाविकांची मोठी गर्दी होते.
मंडपासमोरील गर्दी पाहून जान्हवीच्या चेहऱ्यावरील हावभावच बदलले होते. तिच्या चेहऱ्यावर भीती आणि काळजी स्पष्ट दिसत होती. तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागताच लोकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या. अनेकांनी असं म्हटलंय की, जान्हवी पहिल्यांदाच अशा गर्दीचा सामना करतेय, परंतु असंख्य भारतीय महिलांसाठी हे रोजचं आहे. ‘अशा गर्दीत जायचं तरी कशाला? जर ती इतकी अनकम्फर्टेबल आहे तर’, असा प्रश्न एकाने केला. तर ‘यांना सर्वसामान्यांच्या रांगेतून दर्शनासाठी पाठवा’, असं दुसऱ्याने लिहिलंय.
भाविकांच्या गर्दीतून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जान्हवी आणि सिद्धार्थसाठी वाट मोकळी केली आणि त्यांना दर्शनासाठी स्टेजवर पाठवलं. ‘लालबागचा राजा’च्या पायावर डोकं टेकून जान्हवीने आशीर्वाद घेतला आणि त्यानंतर सिद्धार्थबरोबर तिने फोटोही काढले. परंतु, यावेळीही तिच्या चेहऱ्यावरील भिती स्पष्ट दिसत होती.
जान्हवी आणि सिद्धार्थचा ‘परम सुंदरी’ हा चित्रपट आज २९ ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. सिद्धार्थने परम सचदेवची भूमिका साकारली आहे आणि जान्हवीने थेक्केपट्टू सुंदरी दामोदरम पिल्लईची भूमिका साकारली आहे. याशिवाय रेंजी पणिकर, सिद्धार्थ शंकर, मनजोत सिंग, संजय कपूर आणि इनायत वर्मा हे देखील या चित्रपटात आहेत.