Janhvi Kapoor on mother Sridevis death: बॉलीवूडच्या दिग्गज अभिनेत्रींपैकी एक म्हणून श्रीदेवींचे नाव घेतले जाते. श्रीदेवींनी त्यांच्या कारकिर्दीत ‘आग और शोला’, ‘नगिना’, ‘चालबाज’, ‘घर संसार’, ‘मॉम’, ‘इंग्लीश विंग्लिश’ अशा अनेक चित्रपटांत काम केले. श्रीदेवी यांचे २०१८ मध्ये अचानक निधन झाले. आता दिवंगत अभिनेत्री व चित्रपट निर्माते बोनी कपूर यांची मुलगी जान्हवी कपूरने एका मुलाखतीत केलेले वक्तव्य सध्या चर्चेत आहे.
जान्हवी कपूर काय म्हणाली?
आई-वडील दोघे स्टार असण्यामुळे त्यांची मुलेदेखील सतत चर्चेत असतात. आई-वडिलांमुळे ती सर्वांच्या नजरेत येतात. याचा काही परिणाम झाला का? यावर जान्हवी कपूर म्हणाली, “मी किशोरवयीन असताना पापाराझी किंवा सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला. मला वाटते की तो काळ सर्वांच्या नजरेत येण्याचा सर्वात वाईट काळ होता.”
जान्हवी असेही म्हणाली की, जेव्हा ती पहिल्यांदा सार्वजनिक ठिकाणी सर्वांसमोर आली, त्यावर तिचे नियंत्रण असायला हवे होते. मी माझ्या पहिल्या चित्रपटातून सर्वांसमोर जायला पाहिजे होते. माझ्या खासगी आयुष्यामुळे मी लोकांसमोर जायला नको होते. पापाराझींमुळे लोकांना मी माहीत झाले, त्यामुळे लोकांचा माझ्याकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन तयार झाला. मला माझ्या पालकांमुळे विशेषाधिकार मिळाले आहेत, असे त्यांना वाटले.
या सगळ्यामुळे मी खरी कशी आहे हे लोकांना समजले नाही. मी कोणत्या शाळेत जाते. मी माझ्या मित्र-मैत्रिणींबरोबर कॉन्सर्टला जाते की नाही, मी माझ्या आईचा हात धरून विमानतळावर जाते का, तिच्या चपला घालायला मिळाल्यामुळे मी खूप उत्साही आहे का, अशा अनेक गोष्टी लोकांनी पाहिल्या. त्यांनी मला मोठे होताना पाहिले. मला विशेषाधिकार मिळाले, या भावनेने प्रेक्षकांना माझ्यापासून दूर केले.
ती २० वर्षांची असताना आईचे निधन झाले, त्यामुळे प्रेक्षकांकडून सहानुभूती मिळाली का? यावर जान्हवीने नकार दिला. ती म्हणाली, “मी आणि माझ्या बहिणीने कधीच लोकांना आमचे दु:ख दाखवले नाही, यामुळे लोकांना वाटले की ते आमच्याबद्दल वाईट बोलू शकतात. आम्ही माणसं नाहीत, आम्हाला भावना नाहीत, असेही लोक आमच्याबद्दल बोलले. आम्ही कोणत्या दु:खातून गेलो हे कोणीही समजू शकत नाही. “
श्रीदेवी म्हणजे जान्हवीची आई गेल्यानंतर कोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागला याबद्दल अभिनेत्री म्हणाली, “मीडियाकडून माझ्या प्रत्येक प्रतिक्रियेबद्दल बोलले गेले. ते मला छळ केल्यासारखे वाटले. चित्रपटाचे प्रमोशन करताना जर मी हसले तर लोकांनी मी ठीक आहे, म्हणून माझ्यावर टीका केली. मी शांत बसले तर मला भावना नाहीत असे म्हटले गेले. कल्पना करा, तुम्ही तुमची आई गमावली आहे, आईचे निधन झाले आहे, ते अर्ध्या देशासाठी मनोरंजन आहे.”
जान्हवीने धडक चित्रपटातून पदार्पण केले. त्याच्या एक महिना आधी श्रीदेवींचे २०१८ मध्ये निधन झाले होते.