Janhvi Kapoor Reacts To Kalyan Clinic Assault Case : कल्याणमध्ये श्री बाल चिकित्सालयात सोमवारी (२१ जुलै) संध्याकाळी एका मराठी भाषिक स्वागतिकेला गोकूळ झा या परप्रांतीयाने बेदम मारहाण केली होती. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्यानंतर यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून व पोलिसांकडूनही कारवाई करण्यात आली. अशातच आता बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूरनेही यावर तिची प्रतिक्रिया दिली आहे.

जान्हवी अनेकदा सोशल मीडियामार्फत तिची मतं व्यक्त करत असते. मागे अभिनेत्रीने हिंदी मराठी भाषा वादाप्रकरणावरही सोशल मीडियामार्फत तिचं मत मांडलं होतं. आता अभिनेत्रीने कल्याणमध्ये २५ वर्षीये तरुणीला झालेल्या मारहाणीबद्दल तिची प्रतिक्रिया दिली आहे. २१ जुलै रोजी कल्याणच्या नांदिवली गावातील रुग्णालयात ही घटना घडली होती.

जान्हवीने इन्स्टाग्रामवर याबाबत स्टोरी पोस्ट करत म्हटलं की, “या माणसाला तुरुंगात टाका. हे वर्तन खपवून कसं घेतलं जाऊ शकतं. असं काय झालं की, ज्याने तो इतका संतापला आणि कोणावर तरी इतक्या अमानुषपणे हात उगारला. तुमच्यावर इतकेही संस्कार नाहीत का की असं कृत्य करताना जराही माणुसकी आडवी येत नाही, केलेल्या कृत्याबद्दल जराही वाईट वाटत नाही.”

अभिनेत्री पुढे म्हणाली, “तुम्ही असं कृत्य केल्यानंतर स्वस्थ कसे बसू शकता? लाज वाटायला हवी. आपल्यालाही यासाठी लाज वाटायला हवी की आपण असं कृत्य करणाऱ्यांना काहीच शिक्षा देत नाही. अभिनेत्रीने कल्याण येथे तरुणीसह घडलेल्या प्रसंगावर संताप व्यक्त करत हे कृत्य खपवून न घेण्यासारखं असल्याचं म्हटलं आहे.”

अभिनेत्री जान्हवी कपूरची इन्स्टाग्राम स्टोरी

कल्याणमध्ये मराठी तरुणीसह नेमकं काय घडलं?

सोमवारी, २१ जुलै रोजी कल्याणमधील श्री बाल चिकित्सालयात अनन्या झा तिच्या लहान बाळाला घेऊन डॉ. पालांडे यांच्याकडे आल्या होत्या. त्यावेळी तिचे पती व दीर गोकूळ झा तिच्यासह गेले होते. तेव्हा झा कुटुंबीय त्यांना लवकर प्रवेश मिळावा म्हणून प्रयत्नशील होते. त्यावेळी मराठी स्वागतिकेने त्यांना “डॉक्टर औषध विक्रेते प्रतिनिधी दालनातून बाहेर आले की मी तुम्हाला सोडते”, असे बोलून तिने झा कुटुंबीयाला दालनाबाहेर थांबवले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी त्यांच्यामध्ये झालेल्या बाचाबाचीमध्ये गोकूळ स्वागतिकेला शिवीगाळ करत बाहेर गेला. त्यानंतर संतप्त झालेल्या मराठी स्वागतिकेने आरोपी गोकूळ झाच्या वहिनी अनन्या यांच्या कानशिलात मारली. बाहेर उभ्या असलेल्या गोकूळने हे पाहिलं व त्याने वहिनीला स्वागतिकेने मारल्याने त्याचा राग अनावर झाला आणि त्याने उभ्या असलेल्या तरुणीला बेदम मारहाण केली. तिच्या छातीवर पायाने लाथ मारली. ती खाली पडताच त्याने तिच्या केसाला पकडून तिला दोन ते तीन वेळा उचल आपट केली, तेव्हा तिथे असलेल्या काहींनी मध्ये पडत तिची गोकूळच्या तावडीतून सुटका केली.