सलीम-जावेद या जोडीने भारतीय चित्रपटसृष्टीला एकाहून एक असे सरस चित्रपट दिले. कालांतराने ही जोडी वेगळी झाली, पण आजही प्रेक्षक त्यांची आठवण काढतात. सलीम खान हे इंडस्ट्रीपासून लांब गेले पण जावेद अख्तर मात्र आजही गीतकार म्हणून कार्यरत आहेत. नुकतंच जावेद अख्तर यांनी त्यांचे हनी इराणी यांच्याशी झालेल्या पहिल्या लग्नाबद्दल आणि ११ वर्षांनी घेतलेल्या घटस्फोटाबद्दल भाष्य केलं आहे. हनी इराणी यांच्यापासून विभक्त होण्यामागे जावेद अख्तर यांचं दारूचे व्यसन कारणीभूत होतं हे खुद्द जावेद अख्तर यांनीच स्पष्ट केलं.
‘मोजो स्टोरी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये जावेद अख्तर यांनी युनिफॉर्म सिव्हिल कोडविषयी भाष्य करताना आपल्या पहिल्या लग्नाबद्दल खुलासा केला. जावेद अख्तर म्हणाले, “मी स्वतः युनिफॉर्म सिव्हिल कोडप्रमाणेच जगत आहे. मी एका महिलेशी लग्न केलं अन् ११ वर्षांनी तिच्यापासून घटस्फोट घेऊन वेगळा झालो. मुस्लिम कायद्यानुसार मी तिला केवळ चार महिन्यांचीच पोटगी द्यायला बांधील होतो, पण मी तसा विचार केला नाही. तिची जबाबदारी माझ्यावर होती अन् शेवटी तिला माझी मदत हवी आहे की नाही हे ठरवायचा तिलाही तितकाच अधिकार होता. त्यावेळी मी माझे काही कपडे आणि पुस्तकं घेऊन घराबाहेर पडलो. आम्ही समजूतदार होतो अन् त्यामुळेकझ आज आम्ही एकमेकांचे चांगले मित्र आहोत.”
आणखी वाचा : “मी माझं घर विकून…”, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाबद्दल रणदीप हुड्डाचं मोठं वक्तव्य
पुढे दारूच्या व्यसनाचा आपल्या नात्यावर नेमका कसा परिणाम झाला याबाबतीतही जावेद अख्तर यांनी खुलासा केला. ते म्हणाले, “मी वयाच्या २१ व्या वर्षीच दारू प्यायला सुरुवात केली अन् ४२ व्या वर्षी मी पूर्णपणे दारू सोडली. त्यावेळी मी दारूची एक बाटली घेणं मला सहज शक्य होतं अन् मी रोज रात्री मी एक बाटली दारू सहज रिचवत असे. मला असं वाटतं उर्दू कवि आणि शायर लोकांना दारूची सवय फार सहज लागते कारण त्यांना वाटतं ते मोठे कवि आहेत कलाकार आहेत, त्यांनी अत्यंत बेफिकीरपणे राहिलं पाहिजे अन् दारूचे सेवन करायला पाहिजे. अशा काही भ्रामक संकल्पना माझ्याही डोक्यात होत्या.”
पुढे जावेद अख्तर म्हणाले, “याबरोबरच लखनौमध्ये शिकतांना तिथलं आदरातिथ्य आणि एकूणच मानसन्मान पद्धतीमुळे मी माझ्या काव्यात कधीच कोणताही अपशब्द वापरला नव्हता, त्यामुळेच माझ्या मनात बरीच कटुता होती. पण जेव्हा मी दारू प्यायचो तेव्हा मात्र ही सारी बंधनं विसरून जायचो अन् मी अत्यंत विचित्र वागायचो आणि बऱ्याच वाईट साईट गोष्टी माझ्या तोंडून ऐकायला मिळायच्या, मी एका वेगळ्याच माणसाप्रमाणे वागायचो. याचाच परिणाम माझ्या आणि हनीच्या नात्यावर झाला. मी जर दारूच्या आहारी गेलो नसतो तर आज कदाचित परिस्थिती काहीशी वेगळी असती.”
जावेद यांची दुसरी पत्नी शबाना आजमी हिलादेखील जावेद यांच्या दारूच्या व्यसनाचा पहिली १० वर्षे त्रास झाला, पण नंतर जावेद अख्तर यांनाच त्यांच्या या वर्तणूकीची खंत वाटू लागली अन् त्यांनी नंतर दारुला स्पर्शदेखील केला नसल्याचं त्यांनी या मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं.