Madhuri Dixit & Javed Akhtar : अलीकडच्या काळातील बहुतांश बॉलीवूड सिनेमांमध्ये प्रेक्षकांना रॅप साँग, आयटम साँग ऐकायला मिळतात. या सगळ्या नव्या शैलीच्या गाण्यांमुळे आधीसारखी क्लासिक व साधी-सुंदर गाणी आता बनवली जात नाहीत अशी चर्चा अनेकदा सोशल मीडियावर रंगते. इतकंच नव्हे तर ‘लग जा गले’, ‘देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए’, ‘रिमझिम गिरे सावन’ ही जुनी गाणी कायम रिल्सवर ट्रेंडिंग असतात. ९०च्या दशकातील आणखी एका गाण्याने सिनेप्रेमींच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. हे गाणं प्रदर्शित होऊन जवळपास ३१ वर्षे पूर्ण झाली आहेत. पण, आजही या गाण्याची लोकप्रियता घराघरांत कायम आहे. या गाण्याचं नाव आहे “एक लडकी को देखा तो ऐसा लगा…”
३१ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या “एक लडकी को देखा तो ऐसा लगा…” या गाण्याची जादू आजही कायम आहे. सिनेप्रेमींना या गाण्याचे बोल विशेष भावले. यामुळेच अल्पावधीतच हे गाणं सर्वत्र लोकप्रिय झालं होतं. बॉलीवूडचे प्रसिद्ध कवी व गीतकार जावेद अख्तर यांनी हे गाणं लिहिलं आहे.
एक लड़की को देखा तो ऐसा लगा….
जैसे खिलता गुलाब, जैसे शायर का ख्वाब, जैसे उजली किरण, जैसे वन में हिरन, जैसे चांदनी रात, जैसे नरमी की बात, जैसे मंदिर में हो एक जलता दिया….
गाण्याच्या या शब्दांवरून जावेद अख्तर यांना कायम विचारलं जायचं की त्यांनी हे गाणं नेमकं कोणासाठी लिहिलंय? कोणाला डोळ्यासमोर ठेवून किंवा उद्देशून त्यांनी हे गाणं लिहायला घेतलं? याचा खुलासा जावेद अख्तर यांनी बऱ्याच वर्षांनी एका मुलाखतीत केला होता. माधुरी साधारण १२ वर्षांपूर्वी आजतक वाहिनीच्या एका कार्यक्रमाला गेली होती. यावेळी जावेद अख्तर सुद्धा उपस्थित होते. यावेळी त्यांनी ‘१९४२ – अ लव्हस्टोरी’ या सिनेमातील “एक लडकी को देखा तो ऐसा लगा…” या गाण्याबद्दलचा किस्सा सर्वांना सांगितला.
जावेद अख्तर म्हणाले होते, “या संपूर्ण हॉलमध्ये ही गोष्ट फक्त २ लोकांना माहितीये…ते दोन लोक म्हणजे एक मी आणि दुसरी स्वत: माधुरी दीक्षित. “एक लडकी को देखा तो ऐसा लगा…” हे गाणं जेव्हा मी लिहायला घेतलं तेव्हा माधुरीजी ‘१९४२ – अ लव्हस्टोरी’ या सिनेमाच्या हिरोईन होत्या. त्यानंतर माधुरी मला एका पार्टीत भेटल्या तेव्हा मी त्यांच्याकडे तक्रार केली की, मी तुमच्यासाठी हे गाणं लिहिलं आणि तुम्हीच तो सिनेमा सोडला. खरंतर, ते गाणं मी त्यांनाच डोळ्यासमोर ठेवून लिहिलं होतं. पण, नंतर मला असं समजलं की आता त्याच या सिनेमात नसणार आहेत. त्यांनी सिनेमा सोडला होता”
दरम्यान, माधुरीने ‘१९४२ – अ लव्हस्टोरी’ हा सिनेमा सोडल्यावर यात लोकप्रिय अभिनेत्री मनीषा कोइरालाची वर्णी लागली. हे गाणं मनीषा आणि अनिल कपूर यांच्यावर चित्रित करण्यात आलं असून, कुमार सानू यांनी हे गाणं गायलं आहे.