Javed Akhtar on Amitabh Bachchan: आज अमिताभ बच्चन यांना बॉलीवूडचे महानायक म्हणून ओळखले जाते. ८० च्या दशकातील अँग्री यंग मॅन म्हणून त्यांनी त्यांची ओळख निर्माण केली. बॉलीवूडच्या अनेक गाजलेल्या चित्रपटांत त्यांनी काम केले आहे, त्यामुळे त्यांच्या अभिनयाचा चाहतावर्ग संपूर्ण जगभरात आहे.
पण, तुम्हाला माहीत आहे का? अमिताभ बच्चन यांना ‘जंजीर’ या चित्रपटातून ओळख मिळण्याआधी त्यांचे अनेक चित्रपट फ्लॉप ठरले होते. सलीम खान आणि जावेद अख्तर यांची पटकथा असलेल्या जंजीर या चित्रपटात अमिताभ बच्चन यांना काम करण्याची संधी मिळाली आणि अमिताभ बच्चन यांच्या करिअरला एक वेगळी दिशा मिळाली, त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. विशेष बाब म्हणजे अमिताभ बच्चन यांना जंजीर या चित्रपटासाठी तेव्हा विचारले गेले, ज्यावेळी त्यांच्या हातात काम नव्हते. ते बरोजगार होते, असा खुलासा जावेद अख्तर यांनी केला.
अमिताभ बच्चन यांची अँग्री यंग मॅन ही ओळख….
‘हूक ग्लोबल’ला दिलेल्या मुलाखतीत जावेद अख्तर यांनी याबाबत वक्तव्य केले. जावेद अख्तर म्हणाले, “अमिताभ बच्चन यांची अँग्री यंग मॅन ही ओळख निर्माण झाली, त्याचे श्रेय मी किंवा सलीम खान घेऊ शकत नाही. पण, हे खरे आहे की त्यांना चित्रपटात भूमिका मिळवून देण्यासाठी आम्हाला झगडावे लागले होते, कारण त्यावेळी अमिताभ फार लोकप्रिय नव्हते, त्यामुळे त्यांना प्रमुख भूमिका देण्याबाबत साशंकता होती. पण, मला त्यांनी आधीच्या चित्रपटात केलेले काम आवडले होते.
जावेद अख्तर असेही म्हणाले, अनेकदा आपण प्रतिभेचा आदर करत नाही. त्यांचे ११ चित्रपट सलग फ्लॉप झाले होते, पण असे काही लोक होते, ज्यांचा त्यांच्यावर विश्वास होता. जयाजी त्यापैकी एक होत्या. त्यावेळी अमिताभ बच्चन व त्यांचे लग्न झाले नव्हते, पण त्यांना माहीत होते की अमिताभ बच्चन काय करू शकतात. हृषिकेश मुखर्जींना अमिताभ बच्चन यांचे टॅलेंट माहीत होते.
आम्ही त्यांना अशा चित्रपटात पाहिले, ज्याने चांगली कामगिरी केली नाही. पण, अमिताभ बच्चन हे ताकदीचे कलाकार आहेत हे त्यामध्ये समजत होते. त्यांच्या सर्वात वाईट चित्रपटांमध्येही त्यांनी खूप चांगले काम केले. चित्रपट वाईट होता, पटकथा वाईट होती, संवाद वाईट होते, परंतु त्यांचे काम उत्तम होते; त्यामुळे आम्हाला पूर्ण विश्वास होता, अमिताभ बच्चन मोठे स्टार आहेत. त्यांना फक्त एका योग्य संधीची गरज आहे.
खालिद मोहम्मद यांच्या ‘टू बी ऑर नॉट टू बी: अमिताभ बच्चन’ या पुस्तकात जया बच्चन यांनी त्यांचे पती आणि मुलगा दोघांनीही त्यांच्या व्यावसायिक जीवनात अनुभवलेल्या संघर्षाबद्दल सांगितले होते. त्या अमिताभ बच्चन यांच्याबद्दल म्हणाल्या की, मी त्यांचे अपयश कधीच गांभीर्याने घेतले नाही. कारण ते काही काळापुरतेच आहे हे मला माहीत होते. त्यांच्या कामात प्रगती होताना दिसत होती. त्यांना आलेल्या अपयशाने त्यांची निराशा झाली नाही. मात्र कधीकधी ते म्हणायचे, मी कोणाला नको आहे, कारण मी एक अपयशी अभिनेता आहे.
सलीम खान व जावेद अख्तर या जोडीने लिहिलेल्या पटकथांमुळे अनेक चित्रपट मोठ्या प्रमाणात गाजले, ज्यांची आजही चर्चा होताना दिसते. यामध्ये ‘शोले’, ‘दीवार’ या चित्रपटांचा समावेश आहे. मात्र, अनेक गाजलेल्या चित्रपटांसाठी एकत्र काम केल्यानंतर ही जोडी वेगळी झाली.
अमिताभ बच्चन यांच्या कामाबद्दल बोलायचे तर ते आजही विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतात.