प्रसिद्ध गीतकार व लेखक जावेद अख्तर हे त्यांनी लिहिलेल्या गीतांसाठी आणि शायरीसाठी ओळखले जातातच. याबरोबरच जावेद अख्तर अत्यंत स्पष्ट आणि त्यांच्या सडेतोड वक्तव्यासाठी चर्चेत असतात. कलक्षेत्रात आणि खासकरून संगीतक्षेत्रात झालेल्या बदलांविषयी ते आपुलकीने बोलतात, शिवाय राजकारणावरही ते टप्पणी करत असतात. नुकतंच नवीन गाण्यांमध्ये रॅप जोडण्याबद्दल त्यांनी भाष्य केलं आहे ज्यामुळे ते चर्चेत आहेत.
जुनी गाणी पुन्हा नव्या ढंगात सादर करायला त्यांचा विरोध नाही, पण ते करताना व्यावसायिक दृष्टिकोनातून केलेले बदल संपूर्ण गाण्याची मजा घालवतात असं मत त्यांनी मांडलं आहे. ‘सायरस सेज’शी संवाद साधताना जावेद अख्तर म्हणाले, “जुन्या आठवणींमध्ये रमणं, ती गाणी पुन्हा न नव्या रूपात सादर करणं किंवा तसा प्रयत्न करणं हे अजिबात चुकीचं नाही. परंतु अशा कलात्मक गोष्टींसाठी जुन्या कलाकृतीवर अवलंबून राहणं फार घातक आहे.
पुढे जावेद अख्तर गाण्यांमध्ये होणाऱ्या बदलांविषयी बोलताना म्हणाले, “तुम्ही एक छान जुनं गाणं घेता आणि मग त्यामध्ये अर्थहीन आणि अतिशय विचित्र असा रॅप हा प्रकार अंतरा म्हणून वापरता हे योग्य नाही. हे म्हणजे ताज महालात डिस्को गाणी लावण्यासारखे आहे.” इतकंच नव्हे तर ही गाणी म्हणजे आपला सांस्कृतिक वारसा आहे त्यामुळे त्यांचा असा अवमान योग्य नाही असंही जावेद अख्तर म्हणाले.
ते म्हणाले, “ही जुनी गाणी आजही लोकांच्या मनाच्या जवळ आहेत. महान संगीतकार, गायक-गायिका, गीतकार यांनी मिळून ही गाणी रचली आहेत. तुम्ही त्यांचा आदर करायला हवा. हा आपला सांस्कृतिक वारसा आहे. तुम्हाला जर ही गाणी नव्या रूपात सादर करायची आहेत तर अवश्य करावीत. तुम्हाला केएल सैगल यांचं गाणं अरिजित सिंगच्या आवाजात पुन्हा सादर करायचं आहे अवश्य करा, पण त्यात मध्येच रॅप जोडणं अजिबात योग्य नाही.” जावेद अख्तर हे चित्रपटसृष्टीतील अत्यंत नावाजलेले गीतकार व लेखक आहेत. त्यांना पद्मश्री, पद्मभूषण व ५ वेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.