Jaya Bachchan controversy: बॉलीवूडच्या लोकप्रिय अभिनेत्री जया बच्चन या अनेकदा त्यांच्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमुळे चर्चेत असतात. अनेकदा त्या पापाराझींवर तसेच त्यांच्याबरोबर फोटो काढण्यासाठी आलेल्या चाहत्यांवर भडकतात. त्यांचे हे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतात.

नुकताच जया बच्चन यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्यांच्याबरोबर सेल्फी काढण्यासाठी आलेल्या एका चाहत्याला त्या ढकलून देताना दिसतात. तसेच, त्याला तू काय करत आहेस? असे रागाने विचारताना दिसतात. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी जया बच्चन यांच्या वागण्यावर टीका केली आहे. त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे.

जया बच्चन यांना चाहते फोटो काढत असताना का येतो राग?

अभिनेत्री कंगना रणौत यांनीदेखील सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत जया बच्चन यांच्यावर टीका केली आहे. जया बच्चन यांचे हे वागणे लोक सहन करतात, कारण त्या अमिताभ बच्चन यांच्या पत्नी आहेत, असे म्हणत कंगना रणौत यांनी टीका केली आहे.

याआधीदेखील जया बच्चन यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये त्या अनेकांना रागावताना, संताप करताना दिसतात. त्यांना सार्वजनिक ठिकाणी जेव्हा लोक त्यांच्याबरोबर फोटो काढण्यासाठी येतात ते आवडत नाही, असे म्हटले होते. तसेच, त्याचे कारण काय याचाही खुलासा केला होता.

जया बच्चन यांची नात नव्या नवेली नंदाच्या पॉडकास्टमध्ये यावर त्यांनी वक्तव्य केले होते. जया बच्चन म्हणालेल्या, “मी अशा लोकांचा तिरस्कार करते, जे तुमच्या वैयक्तिक आयुष्याचा आदर करत नाहीत, हस्तक्षेप करतात; अशा लोकांचा मला राग येतो. मी त्यांना असेही म्हणते की, तुम्हाला लाज वाटत नाही का?”

चित्रपटसृष्टीत काम करत असताना अशा प्रकारे लक्ष वेधले जाईल असे वाटले होते का? यावर जया बच्चन म्हणालेल्या, “मला त्याची जाणीव होती, पण माझी त्याला मान्यता नव्हती.” पुढे त्या असेही म्हणाल्या की, “माझ्या कामावर तुम्ही केलेली टीका मी समजू शकते. त्या टीकांचा मी विचार करते, पण माझ्या वैयक्तिक आयुष्यावर टीका करण्याचा अधिकार कोणालाही नाही. माझ्या चारित्र्यावर बोलण्याचा, न्याय करण्याचा अधिकार कोणालाही नाही.”

चाहत्यांशी किंवा पापाराझींबरोबर त्या ज्या पद्धतीने वागतात, त्यामुळे ट्रोलिंग होते. यावर जया बच्चन म्हणाल्या, “मी कुठेतरी बाहेर फिरायला जात असताना, माझ्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप केला जातो. माझे फोटो काढले जातात, मी माणूस नाही का?”

दरम्यान, जया बच्चन या वर्षभरात अशा व्हिडीओंमुळे मोठ्या चर्चेत आल्या आहेत. त्यांच्या वक्तव्यांची, कृतींची मोठी चर्चा होताना दिसते. आता कंगना रणौतने केलेल्या टिप्पणीवर जया बच्चन काय उत्तर देणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.