Jolly LLB 3 : जॉली LLB 3 या चित्रपटाची घोषणा काही दिवसांपूर्वीच झाली आहे. जॉली एलएलबी आणि जॉली एलएलबी २ या दोन चित्रपटांमध्ये अनुक्रमे अर्शद वारसी आणि अक्षय कुमार यांच्या भूमिका आहेत. दरम्यान पार्ट ३ मध्ये हे दोघंही झळकणार आहेत. चित्रपटात पुन्हा कोर्ट रुम ड्रामा पाहण्यास मिळणार आहे. या चित्रपटाची उत्सुकता आहे तरीही चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. कारण अर्शद वारसी आणि अक्षय कुमार यांना या प्रकरणी पुणे न्यायालयाने नोटीस बजावली आहे. या चित्रपटाचे आधीचे दोन भाग उत्तम होते. त्यातला वादी-प्रतिवादी वकिलांचे दावे-प्रतिदावे उत्तम प्रकारे सादर करण्यात आले होते. दोन्ही चित्रपटांमध्ये विषय आणि आशय अशा दोन्ही बाबी होत्या. त्यामुळे तिसऱ्या भागात काय असणार? ही उत्सुकता आहे. दरम्यान चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच कायद्याच्या कचाट्यात अडकला आहे.

काय आहे जॉली एलएलबी थ्रीचं प्रकरण?

वकील वाजेद खान आणि गणेश मस्के यांनी एक याचिका दाखल केली आहे. त्यात त्यांनी हे म्हटलं आहे की या चित्रपटात वकिलांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अभिनेते अक्षय कुमार आणि अर्शद वारसी या दोघांनीही आमचा वकिली पेशा हा कसा विनोदी असतो हे रंगवण्याचा प्रयत्न केला आहे. तसंच यासाठी चित्रपटाचे निर्मातेही जबाबदार आहेत. या याचिकेनंतर अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेता अर्शद वारसी या दोघांना समन्स बजावण्यात आलं आहे. तसंच चित्रपटाच्या निर्मात्यांनाही समन्स धाडण्यात आलं आहे. २८ ऑगस्टला या सगळ्यांना न्यायालयात हजर राहण्यास सांगितलं आहे. चित्रपट १९ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. मात्र याचिकेत ही मागणीही करण्यात आली आहे की चित्रपट प्रदर्शित होऊ देऊ नका. चित्रपटाचा टिझर आल्यानंतर ही याचिका दाखल करण्यात आली आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.

Jolly LLB 3 News
जॉली एलएलबी ३ या चित्रपटात अर्शद वारसी आणि अक्षय कुमार या दोघांच्या भूमिका आहेत. (फोटो-सोशल मीडिया)

याचिकाकर्त्यांचं म्हणणं काय?

याचिकाकर्त्यांनी म्हटलं आहे की न्यायाधीशांना सगळे वकील मामू असं संबोधतात. हा न्याय व्यवस्थेचा अपमान आहे. कोर्टात जे वाद प्रतिवाद दाखवले गेले आहेत ते तर कौटुंबिक कलहांसारखे आहे. आम्हाला मान्य आहे की चित्रपट काल्पनिक असतो. मात्र यात संपूर्ण न्यायव्यवस्थेची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे आम्ही चित्रपटाविरोधात आणि कलाकारांविरोधात याचिका दाखल केली आहे. निर्मात्यांनी चित्रपट १९ सप्टेंबरला प्रदर्शित होईल असं जाहीर केलं आहे. आता अक्षय कुमार आणि अर्शद वारसी तसंच निर्माते पुणे न्यायालयात हजर होतात का? चित्रपट वेळेवर प्रदर्शित होतो का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.