Juhi Chawla married billionaire Jay Mehta: जुही चावला ही बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. याबरोबरच ती एक यशस्वी उद्योजिका आहे. हुरुन रीच लिस्ट इंडियानुसार भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री जुही चावला आहे.

जुही चावलाने ३० वर्षांपूर्वी उद्योजक जय मेहता यांच्याशी लग्नगाठ बांधली होती. एका पार्टीमध्ये त्यांची भेट झाली होती. त्या भेटीचे रुपांतर मैत्रीत झाले आणि पुढे मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. जेव्हा जुहीने जय मेहता यांच्याशी लग्नगाठ बांधली, तेव्हा ती यशाच्या शिखरावर होती.

‘कयामत से कयामत तक’, ‘डर’, ‘हम है राही प्यार के’, ‘इश्क’ अशा ब्लॉकबस्टर चित्रपटांत ती झकळली होती. यादरम्यानच तिने जय मेहतांबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, तिने या लग्नाबद्दल कोणाला सांगितले नाही. जय मेहता आणि जुहीने गुपचूप लग्न केले होते.

जय मेहता मीडियापासून दूर असतात. त्यांनी जरी बॉलीवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रीबरोबर लग्नगाठ बांधली असली तरीही ते कायमच प्रसिद्धीझोतापासून दूर असल्याचे पाहायला मिळते. इतक्या मोठ्या बिझनेसचे मालक असलेल्या जय मेहतांबद्दल कायमच प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता असते.

“लग्नाआधी जय मला दररोज…”

एका मुलाखतीत जुहीने त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल सांगितले होते. तसेच, जय मेहता यांनी वर्षभर जुहीच्या होकाराची वाट पाहिली होती, असेदेखील वक्तव्य अभिनेत्रीने केले होते. ती म्हणालेली, “लग्नाआधी जय मला दररोज पत्र लिहित असे. लग्नानंतर या सगळ्या गोष्टी थांबल्या. त्या दिवसांत आम्ही एकमेकांना पत्र आणि कार्ड पाठवत असू. आता ते व्हॉटसअप मेसेज आणि इमेल्समध्ये रुपांतरीत झाले आहे. जय आणि मी एका पार्टीत भेटलो होतो, त्यानंतर तो सतत माझ्या अवतीभोवती असे. एकदा त्याने माझ्या वाढदिवसाला ट्रकभरून लाल रंगाची गुलाबाची फुले पाठवली होती. त्यानंतर वर्षभराने मी त्याला होकार दिला होता.”

जुही चावला आणि जय मेहता यांनी १९९५ ला लग्न केले, मात्र हे गुपित ठेवले. याबद्दल कोणाला कळू दिले नाही. जेव्हा २००१ मध्ये जुही गरोदर होती त्यावेळी त्यांच्या लग्नाबद्दल सर्वांना समजले.

“त्यावेळी मी काही मोठ्या…”

तिने तिच्या लग्नाबद्दल कोणाला का सांगितले नाही? त्याबद्दल गुप्तता का बाळगली? याबद्दल अभिनेत्रीने एका मुलाखतीत खुलासा केला होता. राजीव मसंदला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री म्हणालेली, “मला चित्रपटसृष्टीत ओळख मिळत होती. माझ्या लग्नामुळे मला काम मिळणार अशी भीती मला वाटत होती. कारण लग्न केल्यामुळे माझ्या करिअरवर परिणाम होऊ शकतो, माझ्या हातातून चित्रपट जातील, असे मला वाटत होते. त्यावेळी मी काही मोठ्या चित्रपटांचे शूटिंग करत होते.”

“मला माझे करिअर करायचे होते, माझ्या आईचे नुकतेच निधन झाले होते, त्यामुळे सगळ्याच गोष्टी माझ्या हातातून निसटून जात असल्याचे मला वाटत होते” या सगळ्यात मला एक मध्यममार्ग दिसला. त्यामुळेच आम्ही आमचे लग्न गुपित ठेवले आणि मी काम करत राहिले.”

जय मेहता यांचे जुहीबरोबरचे हे दुसरे लग्न आहे. त्यांचे पहिले लग्न सुजाता बिर्ला यांच्याशी झाले होते. मात्र, त्यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. या कठीण काळात जुहीने त्यांची भक्कम साथ दिली.

जय मेहता हे बहुराष्ट्रीय कंपनी द मेहता ग्रुपचे अध्यक्ष आहेत. ही कंपनी मुंबईत आहे आणि त्याचे मुख्यालय गांधीनगर येथे आहे. २० व्या शतकाच्या सुरुवातीला या समूहाची स्थापना उद्योगपती नानजी कालिदास मेहता यांनी केली होती. जय मेहता त्यांचे नातू आहेत.

मेहता समूहाचा व्यवसाय साखर, सिमेंट, पॅकेजिंग, फुलशेती, अभियांत्रिकी आणि इलेक्ट्रिकल केबल्स यांसारख्या क्षेत्रांमध्ये आहे. अहवालानुसार, २०२४ पर्यंत त्यांच्या कंपनीचे मूल्य २.१ अब्ज डॉलर्स म्हणजे जवळजवळ १७,५५५ कोटीं पेक्षा जास्त होते.