प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोण व दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्यामध्ये काही दिवसांपासून दिवसाला आठ तास काम करण्यावरून मतभेद असल्याचे पाहायला मिळत आहेत. यामुळे अभिनेत्रीने संदीप रेड्डी वांगा यांच्या ‘स्पिरिट’ चित्रपटातून एक्झिट घेतली. दीपिकाच्या दिवसाला फक्त आठ तास काम करण्याच्या मागणीबद्दल अनेक प्रसिद्ध कलाकारांनी त्यांची मतं मांडली. अशातच आता यावर प्रसिद्ध दिग्दर्शक कबीर खान यांनी त्यांचं मत मांडलं आहे.
कबीर खान यांनी नुकतीच मूव्हीफाइडला (Movified) मुलाखत दिली. यामध्ये ते म्हणाले, “मी ५०० लोक असलेल्या क्रुबरोबर काम करतो. त्यांच्यातील प्रत्येकाचं कुटुंब असतं, त्यामुळे त्यांची काळजी घेणं, त्यांचे मानसिक आरोग्य जपणं हे महत्त्वाचं आहे.” पुढे दीपिकाबद्दल ते म्हणाले, “मला यात काहीच चुकीचं वाटत नाही. आमिर खान, अक्षय कुमारसुद्धा फक्त आठ तास काम करतात, त्यामुळे जर दीपिकाही अशी मागणी करत असेल तर त्यात मला काहीच चुकीचं वाटत नाही आणि जर एखाद्या चित्रपट निर्मात्याला हे पटत नसेल तर त्याने यावर मद्देसुद कारण द्याव.”
कबीर खान यांनी पुढे इंडस्ट्रीमध्ये काम करण्याच्या वेळेवर, मानसिक आरोग्यावरही त्यांचं मत मांडलं. कबीर यांनी चित्रपटासाठी वैयक्तिक आयुष्याचा त्याग करणे हे स्वीकारण्यास नकार दिला. त्यांच्या मते, कामाची एक रचना असली पाहिजे. त्यांनी स्वत: कधी १२ तासांपेक्षा जास्त काळ काम केलेलं नाही. कधीही ओव्हरटाईम किंवा रविवारी काम केलेलं नसल्याचं यामधून सांगितलं आहे.
कबीर खान यांना या मुलाखतीमध्ये माध्यमांच्या वृत्तानुसार दीपिका पादुकोणने चित्रपटासाठी २५ कोटी इतक्या मानधनाची मागणी केलेली, याबाबत तुमचं काय मत आहे असं विचारण्यात आलं होतं. यावर ते म्हणाले, “प्रेक्षकांची किती पसंती मिळत आहे, बॉक्स ऑफिसची गणितं काय सांगतात, तिच्या नावाने किती गर्दी जमा होते यावरून ठरवलं पाहिजे. गर्दी होत असेल, चांगला प्रतिसाद मिळत असेल, त्यांच्या नावामुळे प्रेक्षक चित्रपटगृहापर्यंत येत असतील तर मग तो अभिनेता असो अभिनेत्री असो किंवा कोणी दिग्दर्शक असो, त्यांच्या मागण्या रास्त आहेत असं मला वाटतं,” असं म्हटलं होतं.